

सांगली : विधानपरिषद पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव व पुणे शिक्षक मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या मताधिक्यासाठी सांगली जिल्ह्यातील भाजप सरसावला आहे. दोन्ही उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार भाजपचे सर्व नेते, पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर व्यक्त केला. बूथ स्तरावर मोर्चेबांधणी व प्रत्येक मतदारापर्यंत पाेहोचण्याचे नियोजन करण्यात आले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी सांगलीत संघटनात्मक आढावा बैठक झाली. प्रदेश महामंत्री राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र संयोजक विक्रम पावसकर, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. सत्यजित देशमुख, आ. सदाभाऊ खोत, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, भाजप नेते शरद लाड, राज्य प्रकोष्ठ प्रमुख मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, महापौर धीरज सूर्यवंशी, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार भगवानराव साळुंखे, पृथ्वीराज पाटील, संग्रामसिंह देशमुख, जयश्री पाटील, नीता केळकर, वैभव पाटील, विश्वास डांगे, ब्रह्मानंद पडळकर, सुरेश आवटी, सभापती गीता पवार तसेच प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी मंडलनिहाय आढावा घेतला. ते म्हणाले, मतदारांशी थेट संपर्क आणि मतदानाच्या दिवसापर्यंत त्यांच्याशी समन्वय आवश्यक आहे. प्रत्येक दहा मतदारांमागे एक कार्यकर्ता निश्चित करा. बूथ स्तरावरील यंत्रणा अधिक सक्षम करावी. डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने जबाबदारी निश्चित करून काम करावे. मतदारांशी प्रभावी संपर्क साधून दोन्ही उमेदवारांचे मताधिक्य वाढविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रत्यक्ष मतदार संपर्क महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतदारांना दोन ते तीन वेळा भेटावे. केवळ मत मागून थांबू नये, तर मतदानाच्या दिवशी संबंधित मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचेल, यासाठी नियोजन करावे. नोंदणीकृत मतदारांपैकी जास्तीत जास्त मतदारांचे मतदान घडवून आणण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
भाजप नेते शरद लाड म्हणाले, विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक कोणत्या हवेवर, नॅरेटिव्हवर होत नाही. भाजप महायुतीची बूथस्तरीय यंत्रणा अतिशय सक्षम आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यचे काम प्रभावीपणे होईल. त्यामुळे डॉ. स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे यांना मोठे मताधिक्य मिळेल. दरम्यान, मागील निवडणुकीत १९ हजार मते बाद झाल्याचा मुद्दा उपस्थित करत, मतपत्रिकेद्वारे मतदान होत असल्याने पसंतीक्रम नोंदविताना चुका होऊ नयेत, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याचेही लाड म्हणाले. प्रास्ताविक भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी केले. आभार जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी मानले.