सांगली : आटपाडीत देशमुख आणि पडळकर बंधूंच्या माध्यमातून भाजपचा धमाका

सांगली : आटपाडीत देशमुख आणि पडळकर बंधूंच्या माध्यमातून भाजपचा धमाका

आटपाडी(सांगली); प्रशांत भंडारे : आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत देशमुख आणि पडळकर बंधूंच्या नेतृत्वाखाली भाजपने धमाकेदार कामगिरी केली. शिवसेनेच्या ९ ग्रामपंचायत हस्तगत करत भाजपने २५ पैकी १४ ग्रामपंचायतीवर सरशी साधली. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार बाबर गटाचे तानाजीराव पाटील यांनी एकाकी झुंज देत ८ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या.

आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, अमरसिंह देशमुख, ब्रम्हानंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने नियोजनपूर्वक यंत्रणा राबवत १४ ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला.

आमदार बाबर यांचे समर्थक जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी भाजपच्या तोफखान्याचा एकट्याने मुकाबला करत दिघंची या मोठ्या गावातील सत्ता कायम राखत ८ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपूर्वी पाटील आणि पडळकर गटात राडा झाला. या घटनेनंतर भाजप मधील पूर्वी जमेल तसे एकत्र येणारे देशमुख आणि पडळकर गट खऱ्या अर्थाने एकत्र आले. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे हे दोन्ही गट संघटितपणे आमदार अनिलराव बाबर आणि त्यांचे समर्थक तानाजीराव पाटील यांच्याशी लढले.त्यामुळे भाजपला या निवडणुकांत भरघोस यश मिळाले. शिवसेनेला बॅकफूटवर ढकलण्यात भाजप यशस्वी झाली. आगामी काळात देखील हे समीकरण कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आटपाडी तालुक्यातील निकालाने राजकीय बदलाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.११ ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. भाजपने ९ ग्रामपंचायतीत तर सेनेने दोन ग्रामपंचायतीत परिवर्तन घडवले. राष्ट्रवादीचे हणमंतराव देशमुख यांनी दिघंचीचा बालेकिल्ला पुन्हा सर करण्याचा प्रयत्न केला. भाजपने देखील मोठी मोर्चेबांधणी केली. परंतु तानाजीराव पाटील, अमोल मोरे यांनी हे दोन्ही प्रयत्न साफ अयशस्वी ठरवले.

खरसुंडी येथे सेना, भाजप आणि दोन्ही काँग्रेसमध्ये तिरंगी लढत झाली. तीन पक्षात मतविभागणी झाल्याचा मोठा फटका सेनेला बसला आणि भाजपने संधी साधत पश्चिम भागातील ही मोठी ग्रामपंचायत दीर्घकाळाच्या अंतराने अलगदपणे हस्तगत केली.

तालुक्यातील राजकारणात भाजपचे दोन गट एकत्र लढल्याने विरोधकांना मोठा धक्का बसणार असल्याचे या निवडणुकीतील निकालाने सिद्ध झाले आहे. देशमुख वाडा आणि धनगर वाडा एकत्र आल्याने विरोधकांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसने या निवडणुकीत फारसा सहभाग घेतला नाही. ज्या ठिकाणी भाग घेतला तिथे त्यांना यश मिळाले नाही. दोन्ही काँग्रेसने हेवेदावे बाजूला ठेवत पुन्हा संघटित होऊन आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

निवडणुकांचा हंगाम लवकरच सुरू होत आहे. नवीन वर्षात बाजार समिती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक तसेच आटपाडी नगरपंचायतीची पहिली निवडणूक होणार आहे. २०२४ च्या दिशेने भाजपची तयारी सुरू आहे. परंतु, विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा आमदारकीच्या शर्यतीतील बड्या नेत्यांपैकी कोणी पक्ष बदलला तर मात्र वेगळी समीकरणे उदयास येतील. त्यामुळे आगामी वर्षात तालुक्यातील आणि मतदारसंघात राजकीय संघर्ष आणखी टोकदार होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news