

सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी पदवीधरांच्या सर्वांगीण विकासासाठी नऊ संकल्प मांडले आहेत. रोजगाराभिमुख प्रशिक्षण, उद्योग, ग्रामीण भागातील पदवीधरांना करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांची तयारी, महिला सक्षमीकरण, कृषी व प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला आहे. पदवीधरांच्या शिक्षणाचा उपयोग रोजगारनिर्मितीसाठी व्हावा आणि त्यांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळावी, हा या संकल्पांमागील प्रमुख उद्देश आहे. हा उद्देश पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी कार्यकर्त्यांना केले.
पदवीधरांना रोजगारासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करता यावीत, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सायबर सुरक्षा, सॉफ्टवेअर, डिजिटल मार्केटिंग आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा संकल्प मांडण्यात आला आहे. महाविद्यालये आणि उद्योगांमध्ये समन्वय वाढवून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव, इंटर्नशिप आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील पदवीधरांसाठी तालुकास्तरावर करिअर मार्गदर्शन शिबिरे, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार मेळावे आयोजित करण्याची भूमिकाही डॉ. स्मिता जाधव यांनी मांडली आहे, असे इनामदार यांनी सांगितले. .
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, रेल्वे आणि अन्य स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, डिजिटल लर्निंग सुविधा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा डॉ. स्मिता जाधव यांचा संकल्प आहे. महात्मा फुले इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून नवउद्योजकांना मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि व्यवसायवाढीसाठी मदत करण्यावरही भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळावे, तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस डॉ. स्मिता जाधव यांचा आहे.
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी घरगुती व्यवसाय, स्वयंरोजगार, महिला बचत गट आणि लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट डॉ. स्मिता जाधव यांनी मांडले आहे. त्यांनी महिलांसाठी सुरक्षित वातावरण, आर्थिक साक्षरता, उद्योजकता प्रशिक्षण आणि व्यवसायवाढीसाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. कृषी उद्योग आणि प्रक्रिया उद्योगांच्या विकासातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्पही जाहीर केला आहे. डॉ. स्मिता जाधव यांचा विकासाचा अजेंडा आहे. त्यामुळे निश्चितपणे पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव यांचा विजय निश्चित आहे, असे इनामदार यांनी सांगितले.