

मिरज/ लिंगनूर : बेळंकी (ता. मिरज) येथे डंपरने दुचाकीस्वाराला चिरडल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये भीमराव बाळासाो माळी (वय 35, रा. बेळंकी) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अवैध मुरूम उत्खनन व वाहतुकीमुळे ही दुर्घटना घडल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
दुचाकीस्वार भीमराव माळी हे शनिवारी दुपारी सलगरे येथून बेळंकीत येत असताना मागून आलेल्या मुरुमाच्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत भीमराव माळी हे डंपरच्या मागील चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरच्या नंबरप्लेटखाली अडकून मृतदेह शंभर फूट फरफटत पुढे गेल्याने मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला.
बेळंकीत अवैध मुरूम उत्खनन व मुरुमाची अवैध वाहतूक होत असल्याने या दुर्घटनेत भीमराव माळी यांचा हकनाक जीव गेल्याची तक्रार तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्याकडे ग्रामस्थांनी केली.
अवैध उत्खनन होत असल्याच्या तक्रारीमुळे ग्राम महसूल अधिकारी कणसे यांनी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी तेथे अवैध मुरूम उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाले. अवैध मुरूम उत्खननात शासनाचा महसूल बुडवला जात असूनही महसूल यंत्रणा निष्क्रिय आहे. अवैध उत्खनन करणार्या संबंधितांवर कारवाई करावी, मृत भीमराव माळी यांच्या कुटुंबाला शासकीय आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.