

विटा : सांगली जिल्ह्याच्या नियोजित पर्यटन विकास आराखड्यामध्ये खानापूर तालुक्यातील पर्यटन स्थळांचा समावेश करण्याबाबत शासन सकारात्मक आहे, अशी माहिती मित्रा ‘संस्थेच्या पथकाचे सदस्य अंकित मोदगील यांनी आज (दि.१ सप्टेंबर) दिली.
सांगली जिल्ह्याच्या नियोजित पर्यटन आराखड्यामध्ये खानापूर तालुक्यातील पर्यटन स्थळांचा समावेश करण्याच्या दृष्टीने शासकीय पातळीवर मोठे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाची धोरण सल्लागार संस्था 'मित्रा'च्या पथकाने विटा जवळील सुळकाई मंदिर, रेवणसिद्ध मूळ स्थान , रेणावी येथील रेवणसिद्ध मंदिर, पारे येथील दरगोबा देवस्थान तसेच नौकाविहार तलाव, पौराणिक महात्म्य असलेले शुकाचार्य मंदिर, ऐतिहासिक भूपालगड तथा बाणूरगड किल्ल्यातील शिवकालीन हेरखात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची समाधी या धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळांना भेट दिली.
या पथकात अंकित मोदगील, महेश निकम, चंद्रकांत पाटील तसेच प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार योगेश्वर टोंपे, गटविकास अधिकारी संताजी पाटील, वनपाल आर.एस.पाटील यांचा सहभाग होता.
या भेटीचा मुख्य उद्देश नियोजित सांगली जिल्हा पर्यटन विकास आराखड्यात खानापूर तालुक्यातील पर्यटन स्थळांचा समावेश करणे आणि पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे, जेणेकरून त्यांना उत्पन्नाच्या संधी मिळतील. परिणामी जिल्ह्याचे सरासरी दरडोई उत्पन्न वाढवणे हा आहे. सन २०४७ पर्यंत जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात येणाऱ्या जिल्हा धोरणात्मक नियोजन या व्यापक धोरणाचा हा एक भाग आहे. जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या सुचने नुसार या भेटीचे नियोजन करण्यात आले.
या भेटीत मित्रा' संस्थेच्या सदस्यांनी तालुक्यातील पर्यटन स्थळांचा विकास आराखडा तयार करणे, या ठिकाणी विविध पायाभूत सुविधा आणि पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने नवीन आकर्षणे निर्माण करणे, त्यासाठी अल्पकालीन मध्यम आणि दीर्घकालीन उद्दिष्ट ठरवणे या बाबत स्थानिकांची, पर्यटकांची मते जाणून घेण्यात आली. यामध्ये या पर्यटनस्थळांवर स्वयं रोजगार कसा वाढेल, त्यासाठी शासनामार्फत विविध सबसिडी आणि निधी कसा उपलब्ध होईल याची माहिती पथकाने दिली. तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी विविध शासकीय विभागांचे अधिकारीही उपस्थित होते.