

सांगली : शहरातील कंत्राटदारास एडक्यासारख्या हत्याराचा धाक दाखवत कुख्यात गुंडाने पाच लाखांची खंडणी मागून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कुख्यात गुंड महेंद्र ऊर्फ बाळू वसंत भोकरे याच्यासह अनोळखी दोघांवर शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला. कंत्राटदार अजय सदाशिव लोखंडे (वय 32, रा. गणेशनगर आठवी गल्ली, सांगली) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अजय लोखंडे हे कंत्राटदार आहेत. रोटरी हॉल येथे मार्निंग वॉक ट्रॅकचे काम करण्याचे कंत्राट त्यांना देण्यात आले आहे. त्याठिकाणी त्यांचे काम सुरू आहे. शनिवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास गुंड भोकरे साथीदारांसह तेथे आला. लोखंडे यांच्याकडे काम करणार्या रामलखन पासवान यांच्याकडे पाहून त्याने, काम कोणाचे आहे, येथे कोणी काम करायचे नाही, असे म्हणत तो त्यांच्या अंगावर धावून गेला.
दरम्यान, कंत्राटदार लोखंडे हे मध्यस्थी करण्यासाठी गेले. त्यावेळी गुंड भोकरे याने एडक्यासारख्या हत्याराने दमबाजी करत काम बंद करण्यास सांगितले. काम बंद केले नाही, तर जेसीबी आणि ट्रॅक्टर फोडून टाकण्याची धमकीही दिली. काम सुरू करण्यासाठी पाच लाखांची खंडणी द्यावी लागेल अन्यथा काम सुरू केल्यास जिवे मारीन, अशी धमकी गुंड भोकरे याने दिली.
त्यानंतर कंत्राटदार लोखंडे यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत रात्री उशिरा गुंड भोकरेसह तिघांवर खंडणीचा गुन्हा नोंद केला.
गुंड भोकरे याच्यावर खुनीहल्ला, आर्म अॅक्ट यासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिस उपनिरीक्षक महादेव पोवार अधिक तपास करत आहेत.