

सांगली – मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी चक्क सात समुद्र पार करत एक तरुण थेट ऑस्ट्रेलियातून सांगलीच्या शिराळा तालुक्यात आला आहे. मतदानाला सर्वोच्च स्थान असल्याचं सांगत अन्सार कासिम मुल्ला या तरुणाने हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपल्या गावात उपस्थित राहून मतदान केलं. या घटनेमुळे शिराळा परिसरात मोठी चर्चाही रंगली आहे.
शिराळा नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होत असल्याची माहिती मिळताच अन्सारने क्षणाचाही विचार न करता परदेशातून निघण्याचा निर्णय घेतला. मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे त्याची नोकरी असून, या तारखेचं कळताच त्याने त्वरित विमानतिकिटे बुक केली. जवळपास दीड लाख रुपये खर्च करून अन्सार भारतात दाखल झाला. मतदानासाठी परदेशातून एवढा मोठा प्रवास करणाऱ्या या तरुणाचं कौतुक सर्वत्र होत आहे.
अन्सार शिराळ्यात आल्यानंतर त्याचे मित्र आणि गावातील तरुणांनी फटाक्यांच्या आतषबाजीने त्याचं भव्य स्वागत केलं. गावातील सर्वांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली. “मतदान हा लोकशाहीतील सर्वात मोठा हक्क आहे. आपण कुठेही असलो तरी आपलं मतदान करणे ही जबाबदारी आहे,” अशी भावना त्याने व्यक्त केली.
मतदान केल्यानंतर तहसील कार्यालयामध्ये अन्सार मुल्ला यांचा शिराळा तहसीलदार शामला खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. “आपल्या मतासाठी एवढा मोठा त्याग करणं म्हणजे लोकशाहीप्रती असलेलं प्रामाणिक उत्तरदायित्व. अशी बांधिलकी सर्वांनी ठेवायला हवी,” अशा शब्दांत त्यांचा गौरव करण्यात आला.
अन्सारने सांगितले की,
“मी परदेशात नोकरी करत असलो तरी माझं गाव, माझी जन्मभूमी माझ्या मनात कायम आहे. मतदानाचा दिवस महत्त्वाचा असल्याने मी कोणतीही तडजोड केली नाही. लोकशाही मजबूत राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे.”
मतदानासाठी मेलबर्नहून भारतात येण्यासाठी त्याने अनेक ट्रान्झिट फ्लाइट्सचा प्रवास केला. जवळपास 24 ते 30 तासांचा प्रवास आणि त्यातही महागडी तिकिटे पण मतदानाच्या जबाबदारीसमोर हे सर्व गौण असल्याचं त्याने स्पष्ट म्हटलं.
अन्सार आज संध्याकाळी पुन्हा मेलबर्नला रवाना होत असून, मतदानासाठी इतका मोठा त्याग करणारी ही घटना महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक युवकांनी त्याच्या या उदाहरणातून प्रेरणा घ्यावी, असा संदेश नागरिकांनीही दिला आहे.