आष्टा : येथील आश्रमशाळेतून अकरावीमध्ये शिकणार्या 16 वर्षे वयाच्या अल्पवयीन विद्यार्थ्याचे अज्ञाताने अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवार, दि. 12 रोजी सायंकाळी घडली. आष्टा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
याबाबत येथील माध्यमिक आश्रमशाळेचे अधीक्षक संतोष दिनकर वाटेगावकर (वय 42, रा. बोरगाव, ता. वाळवा) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, संबंधित विद्यार्थ्याची जन्मतारीख 4 जानेवारी 2009 असून त्याचे वय 16 वर्षे 10 महिने 9 दिवस आहे. तो मूळचा तासगाव येथील आहे. तो रंगाने सावळा, उंची 5 फूट 4 इंच, लहान काळे केस, अंगावर क्रीम रंगाचा हाफ शर्ट, निळसर फुल पॅन्ट आहे. तो मराठी बोलतो. हा विद्यार्थी बुधवार दि. 12 रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास येथील माध्यमिक आश्रमशाळेतून अचानक बेपत्ता झाला आहे. विद्यार्थी बेपत्ता झाल्याचे उघड होताच शाळेतील कर्मचारी त्याचा शोध घेत होते. यादरम्यान त्याला अज्ञाताने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची माहिती समोर आली.
वाटेगावकर यांच्या फिर्यादीवरून आष्टा पोलिसांनी अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आष्टा शहरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून शोधमोहीम सुरू केली आहे.
विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण येथील माध्यमिक आश्रमशाळेतून झालेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याच्या अपहरणाची माहिती मिळताच विद्यार्थी व पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आश्रमशाळांच्या सुरक्षेतील त्रुटींवरही प्रश्न उपस्थित होत आहे.