सांगली : पुढारी वृत्तसेवा
जत तालुक्यासाठी संजीवनी ठरणार्या म्हैसाळ - जत विस्तारित पाणी योजनेसाठी आणखी एक हजार कोटीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. याअगोदर 1 हजार कोटी मंजूर झाले असून त्यातील 50 टक्के निधी खर्च झाला आहे. युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. दरम्यान, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी शनिवारी या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.
जिल्ह्याचा पूर्व भाग हा दुष्काळी म्हणून ओळखला जात होता. टेंभू, म्हैसाळ, ताकारी योजनांचे पाणी कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी तालुक्यांत गेले आहे. मात्र जतचा पूर्व भाग पाणी योजनांपासून वंचित होता. या भागाला पाणी मिळावे, अशी तेथील नागरिकांची वारंवार मागणी होत होती. प्रसंगी त्यांनी कर्नाटकातही जाण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हालचाली करून म्हैसाळ-जत विस्तारित योजनेला मंजुरी दिली. गेल्यावर्षी 1 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार कामे सुरू आहेत. उर्वरित आणखी एक हजार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी दिली.
दरम्यान, या विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी शनिवारी या योजनेला भेट देऊन पाहणी केली. दौर्यामध्ये म्हैसाळ येथील पंपगृह, बॅरेज, विस्तारित योजनेचा बेडग येथील टप्पा क्रमांक 1, ऊर्ध्वगामी नलिका, बेळंकी येथील जोड प्रवाही नलिका तसेच बोगद्याच्या कामाची पाहणी केली. विस्तारित योजनेच्या चालू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळअंतर्गत सर्व सिंचन व बांधकाम प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. बैठकीमध्ये कपूर यांनी प्रकल्पांची सद्यस्थिती, अडचणी व आवश्यक निधी आदीसंदर्भात माहिती घेतली व सर्व प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या. कामे करत असताना कामाच्या गुणवत्तेस प्रथमप्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. पाहणी दौर्यात कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, मुख्य अभियंता ए. व्ही. धुमाळ व चंद्रशेखर पाटोळे, अमित कोरे आदी अधिकारी उपस्थित होते.
याबाबत अधिकार्यांनी सांगितले की, म्हैसाळ-जत विस्तारित योजनेची एकाच वर्षामध्ये 50 टक्के कामे पूर्ण झालेली असून त्यासाठी एकूण 450 कोटी इतका खर्च करण्यात आलेला आहे. कामे पूर्ण झाल्यास जत तालुक्यात 65 गावांना सिंचनाचे पाणी उपलब्ध होणार आहे व दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणार्या जत तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपणार आहे.