

सांगली : वीस वर्षांनंतर ज्येष्ठ नेते आणि धनगर समाजाचे प्रभावी नेतृत्व अण्णासाहेब डांगे यांनी आपल्या दोन मुलांसह भारतीय जनता पक्षात (भाजप) पुनरागमन केले आहे. मुंबईतील भाजप कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या वेळी डांगे कुटुंबासोबत त्यांच्या समर्थकांचाही भाजपमध्ये प्रवेश झाला, त्यामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
अण्णासाहेब डांगे हे मूळचे संघ परिवारातून घडलेले नेते असून, १९६७ पासून जनसंघाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९८० मध्ये भाजपच्या स्थापनेपासून ते पक्षात सक्रिय राहिले. अठरा वर्षे विधानपरिषदेचे सदस्य, १९९५ मध्ये ग्रामविकास मंत्री आणि विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली. मात्र, २००२ मध्ये भाजप सोडून त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि २००६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डांगे यांना अपेक्षित सन्मान मिळत नसल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांनी अखेर भाजपमध्ये पुनरागमनाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यात भाजपला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डांगे यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत करत, त्यांच्या राजकीय अनुभवाचा भाजपला मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. डांगे कुटुंबाच्या या घरवापसीमुळे सांगलीसह राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत. डांगे यांच्या पुनरागमनामुळे भाजपच्या संघटनात्मक बळात वाढ होणार असून, सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे नव्याने जुळण्याची शक्यता आहे.