

इस्लामपूर : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे तसेच त्यांचे पुत्र माजी नगराध्यक्ष चिमण डांगे व माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे लवकरच भाजपवासी होणार आहेत. सोमवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक जनसुराज्य शक्तीचे समित कदम यांनी डांगे यांची आष्टा येथे भेट घेऊन प्रवेशाबाबत सविस्तर चर्चा केल्याचे समजते. डांगे यांच्या भाजप प्रवेशामुळे वाळवा तालुक्यात भाजप पक्ष आणखी भक्कम होणार आहे.
मागील आठवड्यात मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, तसेच चिमण डांगे,विश्वनाथ डांगे यांनी भेट घेतली होती. या भेटीत भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे समजते. मंगळवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक तसेच जनसुराज्य पक्षाचे समित कदम यांनी आष्टा येथील डांगे यांच्या शिक्षण संकुलात अण्णासाहेब डांगे यांच्याशी सुमारे दोन तास चर्चा केली. यावेळी माजी नगराध्यक्ष चिमण डांगे, माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे उपस्थित होते. पंधरा दिवसापूर्वी अण्णासाहेब डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त दीनदयाळ सूतगिरणीवर सम्राट महाडिक यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. सम्राट महाडिक भाजपचे जिल्हाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी व जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या भेटीबाबत चिमण डांगे यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी दोघेही शिक्षण संकुलाला भेट देण्यासाठी आले होते. यामध्ये राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.