बापरे...पुन्हा 440 व्होल्टची तार तुटली

सांगलीत घडली असती म्हैसाळची पुनरावृत्ती ःलोकांच्या जीवाशी खेळ; जबाबदारी कोणाची?
Sangli News
सांगली ः हरभट रोडवरून तरुण भारत स्टेडियमकडे जाणार्‍या रस्त्यावर बुधवारी सकाळी 440 व्होल्टची तार तुटून पडली होती.Pudhari Photo
Published on
Updated on

सांगली ः पुढारी वृत्तसेवा

म्हैसाळ येथे 440 व्होल्टच्या तारेचा शॉक बसल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना सांगलीत हरभट रोडवरून तरुण भारत स्टेडियमकडे जाणार्‍या रस्त्यावर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास 440 व्होल्टची तार तुटली. यामुळे मोठी दुर्घटना झाली असती, तर त्याला जबाबदार कोण? लोकांचा जीव गेल्यानंतर यंत्रणा कामात सुधारणा करणार का, असा प्रश्न आहे. येथे तार तुटून खाली पडल्यानंतर काही वेळ ठिणग्या पडत होत्या, फटाके फुटल्यासारखे आवाज येत होते, असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती. लोकांनी अधिकार्‍यांना चांगलाच जाब विचारला.

Sangli News
‘म्हैसाळ’ सौरऊर्जा प्रकल्पाच्या कामास सुरुवात

या मार्गावर दिवस-रात्र रहदारी असते. शाळा, कॉलेजचे मुले-मुली, नागरिक असे अनेकजण ये-जा करतात. मात्र, बुधवारी सुट्टी असल्याने गर्दी थोडी कमी होती. बस किंवा एखाद्या वाहनावर, व्यक्तीवर तार पडली असती तर? याचीही घटनास्थळी तसेच समाजमाध्यमात चर्चा होती. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही तार जोडली होती. मात्र, अवघ्या 15 ते 16 तासातच ही तार तुटून पडली. त्यामुळे यंत्रणेच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. तार बसवताना काही सुधारणा करण्याच्या सूचना केल्या नाहीत का, सूचना दिल्या असतील तर ही घटना कशी घडली, संबंधित ठेकेदाराला दोषी धरले जाणार काय? या गंभीर घटनेबाबत लोकप्रतिनिधींनी अळीमिळीची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दिवसाढवळ्या लोकांच्या जीवाशी सुरू असलेल्या खेळाचा लोकप्रतिनिधी जाब विचारणार का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

स्पार्किंग होत होते. त्यामुळे दुर्घटना होऊ नये म्हणून तार टाकली होती. मात्र, विद्युत प्रवाहाच्या तुलनेत (440 व्होल्ट) लहान तार टाकल्याने ती तुटली. ठेकेदाराने काही गोष्टी चुकीच्या केल्या. वरिष्ठांना घटनेची कल्पना दिली आहे.
- अरविंद इंगळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सांगली.

म्हैसाळ येथील घटनेची आठवण

म्हैसाळ (ता. मिरज) येथे रविवारी 440 व्होल्टच्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने बाप-लेकासह चुलत भावाचा मृत्यू झाला, तर एक मुलगा गंभीर जखमी झाला होता. परिसनाथ मारुती वनमोरे त्यांचा मुलगा साईराज आणि चुलत भाऊ प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत परिसनाथ यांचा मोठा मुलगा हेमंत गंभीर जखमी आहे. सांगलीतील बुधवारच्या घटनेने म्हैसाळच्या घटनेची आठवण नागरिकांना झाली.

Sangli News
अवकाळी पाऊस : हिवाळ्यात प्रथमच राजापूर, म्हैसाळ बंधारे पाण्याखाली
एका रात्रीत तार तुटते यावरून यंत्रणेचा हलगर्जीपणा समोर येतो. या मार्गावर नेहमी रहदारी असते. दुर्घटना घडली नाही, मात्र ती घडली असती तर त्यास जबाबदार कोण? दोषींवर कारवाई झाली पाहिले.
- मारुती गायकवाड नागरिक, सांगली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news