कराड : सिंचन घोटाळा अजित पवारांची पाठ सोडत नाही. मी श्वेतपत्रिका काढायला सांगितली होती. कधीही घोटाळा म्हटलं नव्हतं. सिंचनाच्या अहवालात ७० हजार कोटी खर्च केल्याची माहीती होती. मात्र सिंचनाची वाढ झाली नव्हती. त्यामुळे मी फक्त सत्यता तपासायला सिंचन खात्याला सांगितलं होत. मला चौकशी करायची असती, तर मी अँटी करप्शनला दिली असती. पुन्हा चुका होऊ नयेत, असा माझा उद्देश होता. अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंचन घोटाळ्याबाबत भाष्य केले आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकारांची संवाद साधताना सिंचन घोटाळा आणि तत्कालीन परिस्थिती याबाबत माहिती दिली.
आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विदर्भ महामंडळाची चौकशी व्हावी, असा एक अहवाल आला. तो अहवाल गृहमंत्र्यांना सादर करण्यात आला. त्यामुळे अँटिकरप्शनला चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. याबाबतची माहिती मला नंतर कळाली. आज त्याचा उल्लेख तासगावला अजित पवारांनी केला. सिंचन घोटाळ्याची मी चौकशी लावली नव्हती. मात्र, माझा नाहक बळी घेतला गेला. अजित पवारांनी २०१४ ला सरकार पाडलं आणि भाजप राजवटीची मुहूर्तमेढ रोवली. अजित पवार बोलले ते खरं आहे. मात्र त्यात माझा काय दोष आहे. मी सिंचन प्रकरण असेल किंवा राज्य सहकारी बँक असेल, यामध्ये मी राज्याच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. त्याची शिक्षा मला भोगायला लागली आणि त्याची मला चिंता नाही. सिंचन घोटाळा ७० हजार कोटीचा होता की ४२ हजार कोटीचा याबाबत भोपाळमध्ये नरेंद्र मोदी बोलले होते. त्यामुळे आता कोणाच्या शिक्कामोर्तबची गरज नाही, असेही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.