

आटपाडी : नाशिक येथील गोदावरी नदीच्या तिरी ऐतिहासिक अहिल्या घाट परिसरात, होळकर संस्थानाच्या जागेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य व प्रेरणादायी स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक येथील रामकुंड व अहिल्या घाट परिसर धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. सतराव्या शतकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या परिसराची पुनर्बांधणी करून घाट, मंदिरे तसेच दान-धर्मासाठी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्यामुळे नाशिकचा हा भाग संपूर्ण भारतात एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखला जातो.
सध्या या परिसरात होळकर संस्थान मालकीची जागा उपलब्ध असून, त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारल्यास ते केवळ त्यांच्या कार्याची स्मृती जपणारे ठरणार नाही, तर नाशिकच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक बनेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे २०२७ साली होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक व पर्यटक नाशिकला भेट देणार असून, अशा वेळी हे स्मारक अभिमानास्पद व मार्गदर्शक ठिकाण ठरेल, असा विश्वासही आमदार पडळकर यांनी व्यक्त केला आहे.
या स्मारकासाठी संबंधित विभागामार्फत तातडीने प्रस्ताव तयार करून आवश्यक निधीची तरतूद व शासन निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती त्यांनी मंत्री महाजन यांच्याकडे केली आहे. हे कार्य साकार झाल्यास महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरेत एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.