

कडेगाव : पुढारी वृत्तसेवा; कडेगाव नगरपंचायतमध्ये सत्तेचा व पदाचा गैरवापर वाढला असून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार सुरू आहे. या गैरव्यवहाराची चौकशी होऊन स्थायी समिती रद्द करावी. तसेच संबंधित दोषी पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करीत आर्थिक गैरव्यवहाराची वसुली करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा नगरपंचायतीचे विरोधीपक्ष नेते विजय शिंदे व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक यांच्याकडून देण्यात आला आहे. तर याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती विरोधी पक्षनेते विजय शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी नगरसेवक मनोज मिसाळ, सागर सकटे, संदीप काटकर, सिद्दीक पठाण, नगरसेविका छाया माळी, सीमा जाधव हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना विजय शिंदे म्हणाले की, स्वच्छता ठेकेच्या अंदाजपत्रकानुसार, ३५ किलोमीटर लांबीचे रस्ते रोज साफ करणे आवश्यक आहे. तसेच २९ किलोमीटर गटर महिन्यातून तीन वेळा साफ करणे गरजेचे आहे. तसेच ठेकेदाराने घरोघरी जाऊन घरातील कचरा विलगीकरण करून तो गाडीमध्ये स्वतः आणून टाकणे आवश्यक आहे. परंतु, गावामध्ये यातील ३५ किलोमीटर लांबीचे रस्ते अस्तित्वात नाहीत. तर २९ किलोमीटर लांबीचे गटारही अस्तित्वात नाही. रस्ते सफाई व गटर सफाई हे काम नियमाच्या पंचवीस टक्के देखील केले जात नाही. तर एकाही घरातील कचरा विलगीकरण करून गाडीमध्ये आणून टाकला जात नाही. मात्र, प्रति महिना अंदाज पत्रकाप्रमाणे बिले काढली जातात.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत कडेगाव नगरपंचायत हद्दीत भिंती रंगवणे, बोलकी चित्रे काढणे व कडेगाव नगरपंचायतमध्ये खुर्च्या खरेदी करणे हा विषय १० मार्च २०२२ रोजीच्या स्थायी सभेमध्ये मंजूर झाला व त्याच्या निविदा त्याच सभेमध्ये मंजूर करण्यात आल्या. मात्र, सदर कामे सभेपूर्वीच पूर्ण झालेली आहेत. नगरपंचायतीमध्ये कागदोपत्री कार्यरत असणारा कंत्राटी कर्मचारी नगराध्यक्ष यांनी कायमस्वरूपी एकास गाडीवर ड्रायव्हर म्हणून वापरत आहेत. नगरपंचायत हद्दीत पाच हायमस्ट पोल उभा करCd/e;s काम तीनदा निविदा निघूनही नियमबाह्य पद्धतीने थांबवले. वेळोवेळी लेखी मागणी करूनही विषय पत्रिकेवर नफा फंड जमा खर्च, इमारत नोंदी, बांधकाम परवाने नागरिकाकडून येणारे अर्जबाबत विषय घेणे सुचविले. परंतु, विषय घेतले जात नाहीत. या सर्व बाबी पदाचा गैरवापर व गैरव्यवहार करणारे आहेत. या सर्व विषयाबाबत जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र दिलेले आहे. तेंव्हा याबाबत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचलंत का?