सांगली : लोकवर्गणीतून चालते अंधांची शाळा

शासनाचे डोळे कधी उघडणार? सुशिलाबाई घोडावत निवासी अंध शाळेतील विद्यार्थ्यांचा सवाल
Sangli News
सांगली : यांना अंध कोण म्हणेल?Pudhari Photo
Published on
Updated on

सांगली : नंदू गुरव

डोळे असूनही आंंधळ्यासारख्या वागणार्‍या समाजाचं आपण काय करतो? आजुबाजूचा अन्याय, अत्याचार डोळे असूनही बघत बसणार्‍या माणसांना आपण डोळस का म्हणतो? एका बाजूला डोळे झाकून घ्यावेत अशी परिस्थिती असताना दुसर्‍या बाजूला अंध असणारी माणसं डोळसपणे आपलं आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी जिद्दीनं लढत आहेत. पण दुर्दैव असं की या जिगरबाज मुलांच्या मागं उभं राहावं इतकाही डोळसपणा शासन दाखवत नाही. शासनाचे डोळे कधी उघडणार, असा संतप्त सवाल सौ. सुशीलाबाई दानचंद घोडावत निवासी अंध शाळेतील विद्यार्थ्यांचा आहे.

Sangli News
गोवा : चार विद्यार्थी असतील तरी शाळा सुरूच ठेवणार

अंधांचा शैक्षणिक व सर्वांगीण विकास करण्यासाठी धडपडणारी सौ. सुशीलाबाई दानचंद घोडावत निवासी अंध शाळा ही विनाअनुदानित शाळा. ए. डी. देशपांडे, डॉ. अनिल कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून 4 जानेवारी 2004 रोजी उभी राहिली आणि नॅबच्या आस्थापनेखाली चालवली गेली. विनिता लेले यांनी तेव्हा योगदान दिलं. 6 विद्यार्थ्यांवर सुरू झालेल्या या शाळेत आज सांगली, मिरज आणि परिसरातील 76 मुलं आज पहिलीपासून दहावीपर्यंतचे शिक्षण या शाळेत घेत आहेत. बन्सीकाका ओस्तवाल या ध्येयवेड्या माणसामुळं शाळा चालली आहे.

फक्त लोकवर्गणीतून शाळा आणि तीही अंधांची शाळा चालवणं ही साधीसोपी गोष्ट नाही, पण ओस्तवाल यांच्यामुळं ते शक्य होतं आहे. ही शाळा पूर्णपणे मोफत चालविण्यात येत असूनही या शाळेत अंध विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रशिक्षित सेवाभावी व निष्ठावंत शिक्षक कार्यरत आहेत. मुलांचं संगोपन, पालनपोषण करायला प्रामाणिक कर्मचारी आहेत. शाळेची सुसज्ज इमारत आहे. वसतिगृहही आहे. ब्रेल लिपीतील ग्रंथालय आहे. बोलका संगणक कक्ष आणि लो-व्हिजनचा स्वतंत्र कक्ष आहे. संगीत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासहित आणि सर्व वाद्यांसहित संगीताचं प्रशिक्षण तसेच बुद्धिबळाचं प्रशिक्षण या अंध मुलांना दिलं जातं आहे. हे सारं लोकवर्गणीतून चालवलं जातं. हा कारभार चालवणं म्हणजे सर्कस चालवण्याचा प्रकार, पण ओस्तवाल आणि त्यांचे सहकारी राहुल देशपांडे, डॉ. मुकुंद फाटक, डॉ. बी. टी. कुरणे, सी. वसंतकुमार, महेश पटवर्धन विष्णू तुळुपुळे आणि दिवंगत सहकारी ए. डी. देशपांडे यांच्या सहकार्यामुळं हा डोंगर उचलला गेला आहे.

शाळेची वैशिष्ट्ये :

मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी पोषक वातावरण. सकस व पोषक आहार. दैनदिन व मूलभूत सर्व प्रकारच्या सोयी. उत्तम ब्रेल माध्यम शिक्षण. प्रत्येक विद्यार्थ्यांची दर आठवड्याला आरोग्य तपासणी. व्यायाम, योगासन, प्राणायामाचे प्रशिक्षण. मोबिलिटी ट्रेनिंग (अंध मुलांना पांढरी काठी धरून स्वतंत्रपणे चालण्याचे प्रशिक्षण). क्रीडास्पर्धा.

अंधांचे पुनर्वसन :

सन 1988 पासून आजतागायत 350 ते 400 अंध व्यक्तींचे विविध व्यवसायांच्या माध्यमातून पुनर्वसन करण्यात आले आहे. आज ते स्वाभिमानानं स्वतःच्या पायावर उभे आहेत. संस्थेने अंधांना स्वतःचे घर बांधण्यासाठी मदत तसेच अशिक्षित अंधांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्या 12 ते 15 अंध विद्यार्थी संस्थेच्या माध्यमातून सरकारी व खासगी नोकरीत कार्यरत आहेत.

Sangli News
भंडारा जिल्ह्यातील १०४७ शाळा सीसीटीव्ही कॅमेऱ्याविना

अंधत्व निर्मूलन : नॅब आय हॉस्पिटल

अंध मुलांची शाळा चालवण्यासोबत अंधत्व निर्मूलनाचे कामही संस्था करते. 8 एप्रिल 2018 रोजी स्थापन करण्यात आलेल्या नॅब आय हॉस्पिटलच्या माध्यमातून सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कणकवली तसेच कर्नाटकातील विजापूर व बेळगाव या जिल्ह्यांतून शिबिरे घेण्यात येतात. त्या माध्यमातून मोतिबिंदू, कांचबिंदू, पडद्याच्या शस्त्रक्रिया कॉस्मेटिक, लेसर, फेको इत्यादी उत्तम दर्जाच्या दररोज साधारण 50 ते 60 शस्त्रक्रिया करण्यात येतात. लहान मुलांचा स्वंतत्र विभाग आहे. संस्थेला महात्मा फुले योजना, आयुष्मान भारत योजना लागू आहे. या योजनेशिवाय एकूण शस्त्रक्रियेच्या 50 टक्के शस्त्रक्रिया संस्थेमार्फत पूर्णपणे मोफत केल्या जातात.

“संवेदी उद्यान, डिजिटल क्लासरूम, डिजिटल कॉम्प्युटर लॅब यासोबत अंध पुनर्वसन केंद्र उभं करायचं आहे. अंधांसाठी स्वतंत्र इंडस्ट्री उभारून कमीत कमी 25 अंधांना रोजगार उपलब्ध करून देणं आणि उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया अंधांमार्फत राबविल्या जातील, अशी व्यवस्था उभी करायची आहे. सर्व भाषांच्या परीक्षांना अंध विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून द्यायची आहे. संगणक प्रशिक्षण देवून अंध विद्यार्थ्यांना बोर्डाच्या सर्व परीक्षा विना रायटर देता येतील अशी सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. अंधांना स्वावलंबनाशिवाय स्वाभिमानही मिळावा यासाठी संस्थेला मदतीची खूप आवश्यकता आहे.”
बन्सीकाका ओस्तवाल, अध्यक्ष.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news