सांगली : इस्लामपुरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड | पुढारी

सांगली : इस्लामपुरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा

इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या सीसीटीव्ही प्रणालीच्या सरनोबत वाडा परिसरातील कॅमेर्‍याची मोडतोड केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. याप्रकरणी पोलिस रेकॉर्डवरील गुुंड ज्ञानेश्वर भीमराव पवार, चेतन पांडुरंग पवार, ओंकार राजेंद्र गुरव, अजिज दस्तगीर मुल्ला, ऋतुराज भरत मुसळे (सर्व रा. इस्लामपूर) यांना गुन्हे प्रगटीकरणच्या पथकाने अटक केली. ज्ञानेश्वर याच्यावर खुनी हल्ल्याचे तीन गुन्हे दाखल आहेत.

ज्ञानेश्वर, चेतन, ओंकार, अजिज यांना एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. ऋतुराज याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : इस्लामपूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी आलमगीर लतीफ हे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही सर्व्हेलियन्सचे काम पाहतात. त्यासाठी पोलिस ठाण्यामध्ये वेगळा कक्ष करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी ते सीसीटीव्ही कंट्रोल रुममध्ये आले होते. त्यावेळी सरनोबत वाडा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद व काही कॅमेर्‍यांची दिशा बदलल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर लतिफ यांनी तेथे जाऊन पाहिले असता तेथील कॅमेर्‍याची मोडतोड झाल्याचे दिसले.

लतिफ यांनी कंट्रोल रुममधील व्हिडीओ फुटेजचा बॅकअप पाहिला. त्यामध्ये शुक्रवारी रात्री संशयित ज्ञानेश्वर, चेतन, ओंकार, ऋतुराज, अजिज यांनी दगड मारून कॅमेर्‍यांची तोडफोड केल्याचे व्हिडीओ फुटेजमध्ये दिसले. पाचजणांवर जमावबंदीचा आदेश भंग करणे, दहशत माजविणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे, पोलिस दीपक ठोंबरे, अरूण पाटील, आलमगीर लतिफ, शरद जाधव, सचिन सुतार यांच्या पथकाने कारवाई केली.

वाईट प्रवृत्तींना पायबंद बसणे गरजेचे…

पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे आणि तत्कालीन पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या पुढाकाराने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रणालीसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनीही लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. व्यापारी, छोटे व्यावसायिक, नागरिकांच्या लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसाठी निधी गोळा करण्यात आला. या प्रणालीमुळे शहरातील गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. मात्र आता टवाळांकडून कॅमेर्‍यांची तोडफोड होऊ लागल्याने अशा प्रवृत्तींना पायबंद बसणे गरजेचे बनले आहे.

Back to top button