सांगली : शिराळा तालुक्यात १२ गवे भरवस्तीत | पुढारी

सांगली : शिराळा तालुक्यात १२ गवे भरवस्तीत

शिराळा; पुढारी वृत्तसेवा : शिराळा शहरानजीक गोरक्षनाथ मंदिर, कापरी, जांभळेवाडी, धुमाळवाडी परिसरात चार गवे आज एकाचवेळी दिसले. त्याचप्रमाणे बिऊर, पावलेवाडी, भाटशिरगाव परिसरात आठ गव्यांचे दर्शन झाले. एकाच दिवशी या सार्‍याच भागात बारा गवे दिसल्याने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, याच भागात बिबट्याचाही वावर आहे, सुुजयनगर येथे गवे उसामध्ये शिरल्यावर उसाच्या फडातून बिबट्या बाहेर पडला. यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली.

बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास जांभळेवाडीत नाळ व बामन उगळी परिसरात चार गवे ग्रामस्थांना दिसले. त्यांना लोकांनी हुसकावले. सुजयनगर परिसरात हे गवे एका उसाच्या फडात शिरले. त्याचवेळी उसातून बिबट्या बाहेर आला. त्यामुळे लोकांची एकच धावपळ उडाली. बिबट्या, गवा एकाचवेळी या परिसरात वावरत असल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. भागाईवाडी परिसरातदेखील आज 8 गव्यांचे लोकांना दर्शन झाले आहे .

शिराळा शहरा नजीक असणार्‍या गोरक्षनाथ मंदिर, कापरी, जांभळेवाडी, धुमाळवाडी परिसरात चार तसेच बिऊर, पावलेवाडी, भाटशिरगाव परिसरात आठ अशा बारा गव्यांचे दर्शन झाले आहे. दोन गव्यांचे कळप या परिसरात असल्याने भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, चांदोली राष्ट्रीय उद्याना मध्ये पुरेसे खाद्य मिळत नसल्याने अभयारण्यातील विविध वन्य प्राण्यांचा मानवीवस्तीत वावर वाढला आहे. बिबटे, वानरे यांचा वावर नित्याचाच आहे. यातून पिकांचे नुकसान करीत आहेत . गोरक्षनाथ मंदिराजवळ काही महिन्यांपूर्वी मोटारसायकलचालकांवर बिबट्याने हल्ला केला होता. तडवळे येथे दि.22 फेब्रुवारी 2021 रोजी बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुराच्या मुलाचा सुफियान शमसुद्दीन शेख (वय 11 महिने) याचा मृत्यू झाला होता.

तांदूळवाडी परिसरात गव्यांचे दर्शन

इटकरे; पुढारी वृत्तसेवा : वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी परिसरात बुधवारी दुपारी दोन गव्यांचे दर्शन झाले. त्यामुळे ग्रामस्थांत भितीचे वातावरण झाले आहे.

तांदूळवाडी व येलूरच्या शिवेनजिक बोडकी मळा या परिसरात शेतकर्‍यांना दोन गवे फिरताना दिसले. ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क साधला आहे. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी गव्यांचा बंदोबस्त लवकरच करू, असे सांगितले आहे. परिसरातील शेतकर्‍यांनी रात्री बाहेर पडू नये, असे वनविभागाने सांगितले आहे.

Back to top button