इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा
येथील राजारामबापू दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. विद्यमान अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्यासह 15 जणांनी आपले अर्ज माघारी घेतले. त्यामुळे 19 जागांसाठी 19 च अर्ज राहिले आहेत.
मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू दूध संघाची निवडणूक बिनविरोध झाली. 19 जागांसाठी 34 अर्ज दाखल झाले होते. त्यातील 15 जणांनी आपले अर्ज मागे घेतले. अर्ज मागे घेणार्यांमध्ये विद्यमान अध्यक्ष विनायकराव पाटील, विद्यमान संचालक उदय पाटील यांचा समावेश आहे. तर दूध संघाचे उपाध्यक्षपद भूषवलेले कै.जगन्नाथ पाटील यांचे सुपुत्र सुधीर पाटील (भडकंबे) व संचालक कै. अशोक पाटील यांचे चिरंजीव धैर्यशील पाटील या युवा कार्यकर्त्यांना चांगली संधी मिळाली आहे. सुधीर पाटील हे विद्यमान सरपंच आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक रंजना बारहाते यांनी तर सहायक म्हणून सुरेश पाटील यांनी काम पाहिले. बिनविरोध निवडून आलेले संचालक असे – शशिकांत शंकर पाटील, प्रताप धोंडिराम पाटील, सुधीर जगन्नाथ पाटील, नेताजी शहाजीराव पाटील, संजय मारुती शिंदे, धैर्यशील मानसिंग थोरात, दिलीप यशवंत खांबे, बबन दौलू सावंत, रमेश शिवाजी पाटील, पोपटराव पांडुरंग जगताप, जगन्नाथ मारुती पाटील, धैर्यशील अशोक पाटील, प्रशांत बाजीराव थोरात, संग्राम नानासाहेब फडतरे (सर्व सर्वसाधारण गट) उज्ज्वला विजयकुमार पाटील, मंगल कृष्णात बाबर (महिला राखीव) विकास शिवाजी कांबळे (अनुसुचीत जाती जमाती), अल्लाउद्दीन युसूफ चौगुले (इतर मागास), अनिल सुभाषराव खोत खरात (भटक्या विमुक्त जाती).
संघाचे संचालक, उपाध्यक्ष आणि अध्यक्षपदी काम केलेले नेताजीराव पाटील (तांबवे) यांच्याकडे दूध संघाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविली जाण्याची शक्यता आहे.