सांगली : झेडपी अभियंत्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी; ४ खासगी सावकारांना अटक | पुढारी

सांगली : झेडपी अभियंत्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी; ४ खासगी सावकारांना अटक

इस्लामपूर, पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंत्याला २३ लाख रुपये व्याजाने देवून त्याच्याकडे ९५ लाखाची मागणी करण्यात आली. तसेच त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सावकारांच्या टोळी विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या टोळीतील ४ सावकारांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अभियंता बाजीराव दिनकर पाटील (वय ५४, रा. रक्तपेढीजवळ इस्लामपूर) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी बालम हनीफ जमादार (वय ४०, रा. गोळेवाडी), हिंदुराव बबन मोरे (वय ३७, रा. कापूसखेड), धैर्यशील संताजीराव पाटील (वय ५६, रा. कामेरी), संभाजी शिवाजी पवार (वय ३८, रा. इस्लामपूर) अशी पोलिस कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत.

जगन्नाथ किसन चिखले (रा. नवेखेड), सुजित पाटील (रा. इस्लामपूर), ज्ञानदेव जाधव (रा. सातवे), इस्लामपूर येथील कापड दुकानदार तसेच सांगलीतील तीन व्यापाऱ्यांचाही या टोळीत समावेश असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संशयित बालम, संभाजी, धनंजय, जगन्नाथ, सुजित, धैर्यशील, ज्ञानदेव यांच्यासह चौघा व्यापाऱ्यांनी मिळून १२ जणांनी गट सावकारी सुरू केली होती. बाजीराव पाटील यांनी या सावकारांच्या टोळीकडून ऑक्टोबर २०२० ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत २२ लाख ९० हजार रुपये व्याजाने घेतले होते. संशयित बालम जमादार हा दिनकर पाटील यांच्या घरी येवून ९५ लाख रुपयांची मागणी करत होता. रक्कम न दिल्यास बाजीराव पाटील व त्यांच्या कुटूंबाला ते मारण्याची धमकी संशयित देत होते.

सावकार संभाजी पवार याच्याकडून बाजीराव पाटील यांनी ९० हजार रुपये घेतले होते. पवार याला ७२ हजार रुपयांची रक्कम देवूनही पवार हा पाटील यांच्याकडे ४ लाख रुपयांची मागणी करत होता. पाटील यांची मोटारसायकल जबरदस्तीने काढून घेतली. तसेच कोठे तक्रार केल्यास जीवंत ठेवणार नाही, अशी धमकीही दिली.

त्याचबरोबर पाटील यांनी ज्ञानदेव जाधव यांच्याकडून ३ लाख रुपये घेतले होते. व्याजाचे १ लाख १४ हजार देवूनही, जाधव हा ३ लाख ६० हजार रुपयांची मागणी करून नोकरी घालविण्याची धमकी देत होता. सावकारांच्या टोळीच्या त्रासाला कंटाळून बाजीराव पाटील यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात टोळीविरोधात फिर्याद दिली. टोळीतील बालम, हिंदुराव, संभाजी, धैर्यशील यांना पोलिसांनी अटक केली असून शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चौघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

हेही वाचा

Back to top button