

विटा: पुढारी वृत्तसेवा: विटा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज (दि. २८) सकाळी चुरशीने मतदानाला सुरूवात झाली. खानापूर आणि कडेगाव तालुक्यात एकूण ९१.३० टक्के मतदान झाले. काँग्रेस, भाजप आणि शिंदे गट युती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होत आहे. एकूण १८ जागांपैकी सत्ताधारी गटाची हमाल आणि तोलाई गटातील एक जागा बिनविरोध झाली आहे.
एकूण १७ जागांसाठी ३४ जण रिंगणात आहेत. एकूण १ हजार ४६६ मतदार आहेत. एकूण दाखल ३४ अर्जांपैकी यात सोसायटी गटात ७ जागांसाठी १४ अर्ज दाखल आहेत. इतर मागासवर्गीय एका जागेसाठी ३ अर्ज, भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी एक जागेसाठी २ अर्ज दाखल आहेत. महिलांच्या दोन जागांसाठी ५ अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण २ जागेसाठी ४ अर्ज, आर्थिक दुर्बल घटकांच्या एका जागेसाठी २ अर्ज, अनुसूचित जातीच्या एक जागेसाठी २ अर्ज, व्यापारी गटाच्या दोन जागेसाठी ३ अर्ज दाखल झाले आहेत. तर हमाल तोलाई दार जागेसाठी एकच अर्ज शिल्लक राहिल्याने ही जागा बिनविरोध झाली आहे.
विटा बाजार समितीसाठी कडेगाव आणि खानापूर येथे प्रत्येकी एक अशी एकूण दोन मतदान केंद्रे आहेत. विट्यातील लिलाताई देशचौगुले प्राथमिक विद्यामंदिरात मतदान केंद्र आहे. याठिकाणी सकाळी आठ वाजता मतदानाला सुरूवात झाली. सकाळी दहा वाजेपर्यंत फक्त दहा टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मात्र मतदानाचा वेग वाढला. दुपारी बारा वाजता ऐन तळपत्या उन्हात देखील मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. विशेषतः सोसायटी आणि ग्रामपंचायत गटातील मतदानासाठी रांग लावून मतदान झाले. विट्यातील मतदान केंद्राबाहेर आमदार अनिल बाबर, अमोल बाबर, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, माजी आमदार सदाशिव पाटील यांच्यासह तालुक्यातील नेते केंद्रावर ठाण मांडून होती.
व्यापारी गटात मतदारांचा उत्साह दिसत नव्हता. मतदान शांततेत सुरू असल्याचे दिसून आले. मतदारांना आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी यंत्रणा सज्ज केली होती. एका बाजूला आमदार अनिल बाबर, माजी नगरसेवक अमोल बाबर, सुहास शिंदे, रविंद्रअण्णा देशमुख, नंदकुमार पाटील, कृष्णदेव शिंदे, गणपतराव भोसले तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार सदाशिव पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, सुशांत देवकर, सचिन शिंदे, राजेंद्र माने, किसन जानकर यांच्यासह कार्यकर्ते मतदान केंद्रावर दिवसभर होते.
मतदानाची अंतिम आकडेवारी अशी ; सोसायटी गटात १ हजार ४६६ पैकी १हजार ३७५ मतदान म्हणजे ९३.८९ टक्के मतदान झाले. ग्रामपंचायत गटात १ हजार १३५ पैकी १ हजार ३० मतदारांनी मतदान झाले. या गटात ९०.७५ टक्के मतदान झाले. व्यापारी गटात ५२५ पैकी ४४९ मतदारांनी मतदान केले. या गटात ८५.५२ टक्के मतदान झाले. तर ३ हजार १७४ पैकी २ हजार ८५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९१.३० टक्के मतदान झाले.
दरम्यान, शनिवारी (दि. २९) एकूण १० टेबलवर ३० कर्मचाऱ्यांच्या मदतीने १० फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत प्रत्यक्ष निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा