आटपाडीमध्ये व्हॅन-कार अपघात; २ महिला ठार | पुढारी

आटपाडीमध्ये व्हॅन-कार अपघात; २ महिला ठार

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : आटपाडी मध्ये व्हॅन-कार अपघातात २ महिला ठार झाल्या आहेत. पळसखेल-आवळाई फाटा रस्त्यावर पिकअप व्हॅन आणि कारची धडक झाली. त्यामुळे पिकअप व्हॅनचा ताबा सुटून झालेल्या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या. तर एक महिला गंभीर जखमी झाली. शुक्रवारी दुपारी एक वाजता हा विचित्र अपघात घडला.

मंगल कृष्णा बंडगर (वय 25) आणि ताराबाई बालाजी बंडगर (वय 16, दोघीही रा. शिरोळ, ता. निलंगा जि. लातूर) अशी मयत महिलांची नावे आहेत तर पूजा दयानंद बंडगर (वय 23 रा. शिरोळ, ता. निलंगा जि. लातूर) ही महिला गंभीर जखमी झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, पळसखेल गावातूनयेणार्‍या पांढर्‍या रंगाच्या कारने निंबवडे गावातून दिघंचीकडे जाणार्‍या पिकअप व्हॅनला जोरदार धडक दिली. या अपघातात बसलेल्या धक्यामुळे पिकअप व्हॅन चालकाचा वाहनावरचा ताबा सुटला.

वाहकाचा ताबा सुटलेल्या पिकअप व्हॅनने रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन महिलांना जोरात ठोकर दिली. या धडकेने तिन्ही महिला उडून शेजारच्या शेतात पडल्या.डोक्यास गंभीर दुखापत आणि रक्तस्त्राव झाल्याने मंगल बंडगर आणि ताराबाई बंडगर गंभीर जखमी झाल्या आणि जागीच ठार झाल्या. पूजा बंडगर गंभीर जखमी झाली.

आवळाई-पळसखेल येथील अतुल पवार यांच्या स्टोनक्रशर वर मजुरीकाम करण्यासाठी या महिला गेल्यावर्षी पासून राहतात .दिघंची निंबवडे रस्त्याने त्या कोळे वस्तीवर पिण्याचे पाणी आणायला चालल्या होत्या. पाणी आणण्यासाठी जाताना या महिला पळसखेल-आवळाई फाट्यावर आल्या असता अचानक पिकअप व्हॅनने ठोकरल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. याबाबत पूजा बंडगर यांनी वर्दी दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करत आहेत. दरम्यान काल दुपारी एक वाजता झालेल्या अपघातातील वाहनांचे नंबर पोलिसांना अद्याप मिळाले नाहीत. अपघात झाल्यानंतर 11 तासांनी गुन्हा नोंद झाला.

Back to top button