प्रशासनाने दबावाखाली येऊन निर्णय घेतल्यास रस्त्यावर उतरू : वैभव पाटील यांचा इशारा | पुढारी

प्रशासनाने दबावाखाली येऊन निर्णय घेतल्यास रस्त्यावर उतरू : वैभव पाटील यांचा इशारा

विटा : पुढारी वृत्तसेवा

पालिकेच्या आगामी निवडणूकीत पराभव दिसू लागल्यानेच विरोधकांनी आता मतदारांवरच हरकती घेतल्या आहेत. त्यात प्रशासनानेही कोणाच्या दबावाखाली  निर्णय घेतल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरु, असा इशारा माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी दिला आहे.

यावर्षी मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ५ डिसेंबरपर्यंत राबवण्यात आला. यामध्‍ये विटा शहरातील १ हजार ८९१ मतदाराच्या विरुद्ध शहरातील ३२ वेगवेगळ्या व्यक्तींनी हर कती घेऊन या व्यक्ती स्थलांतरित झालेल्या आहेत, त्या विटा शहरात राहत नाहीत, मृत झाल्यात अथवा काही मतदार मुली विवाह होऊन दुसऱ्या गावी गेल्यात इ. कारणांमुळे अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळावी,  अशी मागणी  केली आहे. याबाबतची सुनावणी सध्या तहसील कार्यालयात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पत्रकार बैठक घेत विरोधकांवर निशाणा साधला.

यावेळी पाटील म्हणाले, कागदपत्रांची पडताळणी करूनच एखाद्या मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाते. मतदार पुर्ननिरिक्षण कार्यक्रम सुरू झाल्यापासून जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करावी, असे आवाहन केले जात आहे. मात्र या याठिकाणी जवळपास अठराशेच्या वर लोकांची नावे मतदार यादीतून कमी करा, अशी मागणी केली जात आहे.

गेल्या पाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी चांगले काम केल्यानेच विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे शेकडो मतदारांवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना समोरासमोर घेवून सुनावणी करावी अशी मागणी आम्ही तहसीलदारांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बी.एल.ओं च्या कामावर आक्षेप कशासाठी? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.

निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदारांना काही तासांच्या मुदतीच्या नोटीसा दिल्या आहेत. राजकीय दबावाखाली येत प्रशासनाने मतदारांची नावे वगळली तर रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, माजी सभापती ॲड. विजय जाधव, विनोद पाटील, मंगेश हजारे, संजय तारळेकर, प्रताप सुतार, उपनगराध्यक्ष सुभाष भिंगारदेवे, फिरोज तांबोळी, धर्मेश पाटील उपस्थित होते.

हेही वाचलं का? 

Back to top button