शिवपुतळा विटंबना : मिरजेत संतप्त शिवसैनिकांनी कर्नाटकातील वाहने फोडली; रुग्णालयाच्या फलकवार दगडफेक | पुढारी

शिवपुतळा विटंबना : मिरजेत संतप्त शिवसैनिकांनी कर्नाटकातील वाहने फोडली; रुग्णालयाच्या फलकवार दगडफेक

मिरज, पुढारी वृत्तसेवा

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेचे शनिवारी मिरज शहरात तीव्र पडसाद उमटले. शिवसैनिकांनी स्टेशन चौकात कर्नाटकातील दोन गाड्यांवर दगड, काठीने मारून काचा फोडून तोडफोड केली. येणा-जाणाऱ्या कर्नाटक वाहनांवर दगडफेक केल्याने नागरिकांची धावपळ उडाली. तसेच दुकान व रुग्णाल्यावर असलेले कन्नड फलकही फाडण्यात आले. महात्मा गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिवसेनेचे शहराध्यक्ष चंद्रकांत मैगुरे यांच्यासह नऊजणांना अटक केली.

बंगळूर येथे समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने मिरजेत संतप्त शिवसैनिक रस्त्यावर उतरले. शनिवारी शिवसेना शहराध्यक्ष चंद्रकांत मैगुरे यांच्यासह पप्पू शिंदे, विजय शिंदे, प्रकाश जाधव, दिलीप नाईक, महादेव हुलवान, गजानन मोरे, अतुल रसाळ, किरण कांबळे, प्रकाश जाधव, दिलीप नाईक यांच्यासह शिवसैनिकांनी स्टेशन चौकात कर्नाटकातील वाहनांना लक्ष्य केले.

कर्नाटक नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर चढून कर्नाटक सरकाच्या विरोधात घोषणाबाजी करत दगडफेक केली. काठीने गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच स्थानिक दुकानावर व रुग्णाल्यवार असलेले कन्नड फलक फाडले. यामुळे एकच धावपळ उडाल्याने शहरातील दुकाने पटापट बंद झाली. गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दगडफेक करणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेतले. याप्रकरणी नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर शिवसैनिकांनी मिरज मार्केट परिसरामध्ये कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली. त्यामुळे मिरज मार्केट परिसरातदेखील मोठा तणाव निर्माण झाला होता. शिवसेना आक्रमक झाल्यामुळे शहरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच कर्नाटकमध्ये प्रवेश

मिरजमध्ये कर्नाटकच्या वाहनांना लक्ष करून तोडफोड करण्यात आल्याने त्याचे पडसाद कागवडमध्ये उमटले. कागवाडमध्ये कन्नडीगांनी आंदोलन सुरू केल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर दोन्ही पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कर्नाटकातून येणारी वाहने महाराष्ट्रात येत होती. परंतु कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्रातील केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच कर्नाटकमध्ये प्रवेश दिला.

हेही वाचा

Back to top button