शिवपुतळा विटंबना: शिवसैनिक आक्रमक, मुंबई भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन | पुढारी

शिवपुतळा विटंबना: शिवसैनिक आक्रमक, मुंबई भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन

मुंबई : पुढारी ऑनलाईन

बंगळूर येथे शिवपुतळा विटंबनाप्रकरणी बेळगावात शनिवारी सकाळपासून जमावबंदी आदेश जारी केला आहे. शुक्रवारी रात्री शहरात ठिकठिकाणी दगडफेक प्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले असून २७ जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दूसरीकडे, बंगळूर येथील क्षुल्लक घटनेमुळे बेळगावात दगडफेक करून, गुंडगिरी केली जात आहे. अशा घटना खपवून घेणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हुबळी येथे केले. बंगळुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेला क्षुल्लक बाब म्हणत मुख्यमंत्री बोम्मई यांनी मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या धक्कादायक विधानंतर महाराष्ट्रातील शिवभक्त संतापले आहेत. तर मुंबईत शिवसेना आणि शिवप्रेमी आक्रमक झाल्याचे समोर येत आहे. शनिवारी सायंकाळी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करत बोम्मई यांच्या निषेधाचे बॅनर झकावले. ‘बोम्मई म्हणतात की अशा छोट्यामोठ्या गोष्टी होत असतात. म्हणजे शिवाजी महाराज हे छोटी-मोठी गोष्ट आहेत का? मग भाजपचं शिवरायांवरील प्रेम बेगडी आहे का? असा सवालही शिवसैनिकांनी उपस्थित केला. कर्नाटक सरकार जर माफी मागणार नसेल तर त्यांच्या बसेस महाराष्ट्रात येतात. त्याचा त्यांनी विचार करावा, असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भडकले…

छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. बंगळूरमधील समाजकंटकावर कडक कारवाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक सरकारला कडक कारवाईचे आदेश द्‍यावेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्‍हटलं आहे.

बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत अघटीत घडले आहे, तर त्याची कसून चौकशी करायलाच हवी. या प्रकाराकडे डोळेझाक करू नका, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, गेले कित्येक वर्ष कर्नाटकमधील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे. आता तर शिवरायांसारख्या आपल्याआराध्य दैवताची विटंबना करण्याची घटना घडते. तेथील सरकार याकडे डोळेझाक करते, हे दुर्दैवी असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून निषेध…

संपूर्ण भारताची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकात विटंबना झाली. त्याचा आम्ही तिव्र शब्दात निषेध करतो. या घटनेचे देशभरात पडसाद उमठत आहेत. सरकारने त्या समाजकंटकांना शोधून काढून त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मंत्री आदित्य ठाकरे यांचाकडून निषेध…

बंगळुरूमध्ये झालेला प्रकार अतिशय संतापजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अशा नजरेतून बघणाऱ्यांना भर चौकात सजा देणे गरजेचे आहे आणि सरकार ह्या राष्ट्रद्रोह्यांना कडक सजा करेल, ही अपेक्षा आहे!

 

Back to top button