आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा; सांगलीत केंद्रीय पथकाच्या सूचना | पुढारी

आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा; सांगलीत केंद्रीय पथकाच्या सूचना

सांगली; पुढारी वृत्तसेवा : आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा; केंद्रीय पथकाने सूचना केल्या. जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांचा केंद्रीय पथकाकडून शुक्रवारी आढावा घेतला. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता गृहीत धरून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा, कोरोचा चाचण्या आणि लसीकरण वाढवा, बेड संख्या वाढवा, कोरोना हॉटस्पॉट निश्‍चित करून उपाययोजना राबवा, कंटेन्मेंट झोनची कार्यवाही कडकपणे करा, अशा सूचना केंद्रीय पथकाने दिल्या.

या पथकात आरोग्य व कुटुंब नियोजनच्या विभागीय कार्यालयाचे अधिकारी डॉ. प्रणील कांबळे, ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन नागपूरचे असोसिएट प्रोफेसर आणि छाती रोगतज्ज्ञ डॉ. सत्यजित साहू, राज्यसर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांचा समावेश आहे.

या आरोग्य कमिटीने शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, महापालिका लसीकरण केंद्र आणि वाळवा तालुक्यातील नेर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कोरोना नियंत्रण उपाययोजनांची पाहणी केली. महापालिकेकडून कोरोना नियंत्रणासाठी केल्या जाणार्‍या उपाययोजनांचा पथकाकडून आढावा घेण्यात आला.

यावेळी पथकातील सदस्यांनी महापालिकेच्या विश्रामबाग शहरी आरोग्यकेंद्राचीही पाहणी केली. लसीकरण प्रक्रियेची माहिती घेतली.जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, सहायक आयुक्त पराग कोडगुले आणि डॉ वैभव पाटील यांनी महापालिका क्षेत्रात सुरू असणार्‍या कोरोना नियंत्रण उपाययोजनांची माहिती दिली. महापालिकेकडील सद्यस्थितीत असणारी यंत्रणा, सीसीसी, कोव्हिड हेल्थ सेंटर, ऑक्सिजन उपलब्धता, लसीकरण प्रक्रिया तसेच तिसर्‍या लाटेसाठी सज्ज असणार्‍या यंत्रणेची सविस्तर माहिती केंद्रीय पथकाला दिली.

समितीकडून मिरजेतील शासकीय वैाद्यकीय महाविद्यालयस भेट देण्यात आली. रुग्णलयात दाखल असलेले कोरोना रुग्ण, त्यांच्यावर होत असलेले उपचार, तेथील ऑक्सीजन पुरवठा इत्यादींचा आढावा घेतला. जिल्ह्यातील कोरोना चाचण्या वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोरोना चाचणी करताना संबंधित रुग्णाचे लसीकरण झाले आहे का, याची कटाकक्षाने नोंद ठेवण्याची सूचना देखील यावेळी देण्यात आली.

ऑक्सिजन सज्ज ठेवा : केंद्रीय पथक

तिसर्‍या लाटेत रुग्णसंख्या वाढल्यास ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी आतापासून पुढील तीन महिन्यांची यंत्रणा कार्यान्वित ठेवावी, तसेच ऑक्सिजन पुरवठा देखील सज्ज ठेवावा, अशा सक्त सूचना केंद्रीय समितीच्या वतीने देण्यात आल्या.

Back to top button