सांगली : आटपाडी, तासगावात जोरदार पाऊस

सांगली : आटपाडी, तासगावात जोरदार पाऊस

तासगाव/मांजर्डे/आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : तासगाव तालुक्यासह आटपाडी शहर व परिसरात गुरुवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली. आटपाडीत मापटेमळा येथे पुलावरून गाडीसह वाहून जाणार्‍या वृद्धाला युवकांनी वाचवले. आटपाडीत संध्याकाळी ब्राम्हण गल्लीतील साई मंदिराजवळ विलायती चिंचेचे झाड विजेच्या तारांवर कोसळल्याने शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. पावसामुळे आटपाडी-निंबवडे रस्त्यावर मापटे मळा येथील पुलावरून पाणी वाहत होते. पंचायत समितीसमोरील चहा विक्रेते किसन माळी हे दुचाकीवरून जात असताना पुलावरून जोरदार वाहणार्‍या पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे ते वाहून जाऊ लागले. त्यावेळी नामदेव सातारकर, राजू सातारकर, आदित्य सातारकर व गणेश सातारकर हे त्यांच्या मदतीला धावून आले. या युवकांनी वाहून जाणारी दुचाकी पकडली आणि किसन माळी पुलावरून पडण्याच्या पूर्वीच त्यांना वाचवले.

तासगावात ढगफुटीसदृश पाऊस

तासगाव तालुक्यातील मांजर्डे, आरवडे, बलगवडे, बस्तवडे, लोढे, खुजगाव, वाघापूर, कौलगे, गौरगावसह परिसरात ढगफुटीसदृश पाऊस पडला. तसेच मणेराजुरी, सावर्डे, वज्रचौंडे, सावळज, डोंगरसोनी, अंजनी, बिरणवाडी, खुजगाव, सिद्धेवाडी, दहिवडी परिसरातही पावसाने जोरदार 'बॅटिंग' केली. त्यामुळे अनेक ठिकाणी ओढे, नाल्यांना पूर आला आहे. गुरुवारी दुपारी ढगफुटीसदृश पावसाने परिसराला जवळपास दोन तास झोडपून काढले. अनेकांच्या शेतातील बांध फुटले आहेत. ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक गावांतील ओढ्यांना पूर आला. बलगवडे, गौरगाव, डोर्ली या गावांतील तलाव भरले आहेत. परिसरात सर्वत्र पाणीच पाणी साचल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. कौलगे-बलगवडे, मांजर्डे- गौरगाव, खुजगाव-सावळज, बस्तवडे-बलगवडे अशा अनेक रस्त्यांवर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. लोढे, पुणदी तलावात पाणी येण्यास सुरुवात झाली असून, पाणी पातळी वाढली आहे.

तासगाव पूर्व भागातील सावळज व मणेराजुरी परिसरातही तुफान पाऊस बरसला. पावसामुळे ओढे, नाल्यांना पूर आला आहे. झालेल्या दमदार पावसामुळे मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. मणेराजुरी गावात व भोसलेनगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. द्राक्षबागांतून व रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. अग्रणी नदीला यापूर्वीच पूर आला आहे. सिद्धेवाडी तलाव, अंजनी तलावात जोरदार पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news