

कोल्हापूर : राजेंद्र जोशी
'ओमायक्रॉन' या कोरोना विषाणूच्या संभाव्य नव्या रूपाने जगभर निर्माण केलेल्या चिंतेच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी तातडीने पावले उचलली आहेत. जिल्ह्याच्या सीमेवर पहारा बसविताना कडक आचारसंहिताही लागू केली आहे. तथापि, ही आचारसंहिता पाळण्याचा आदर्श घालून देण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य नागरिकांची जबाबदारी वाढली आहे; अन्यथा जिल्ह्यात कोरोनाच्या तिसर्या लाटेेचा धोका वाढू शकतो. (Kolhapur politics)
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेत जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत लोकप्रतिनिधींनी आचारसंहितेला दिलेली सोडचिठ्ठी वादग्रस्त ठरली होती. आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका ऐन रंगात आहेत. या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शक्तिप्रदर्शन सुरू झाले आहे. उमेदवारांना पर्यटनस्थळी नेण्यासाठी वाहने सज्ज होतील आणि मेळावे, ओल्या पार्ट्या झडण्यास सुरुवातही होईल. अशा कार्यक्रमात आचारसंहितेला सर्वप्रथम तिलांजली दिली जाते, असा अनुभव आहे. यामुळे जिल्ह्यातील जबाबदार लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केले, तर आचारसंहिता पाळायची कोणी? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच सर्वसामान्य नागरिकांनी जर लोकप्रतिनिधींकडे बोट दाखविले, तर त्याला निरुत्तर करणे अशक्य होणार आहे. (Kolhapur politics)
'ओमायक्रॉन'च्या संभाव्य संसर्गाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगल कार्यालये, चित्रपटगृहे, मॉल यांमधील प्रवेश संख्या आणि प्रवेश पात्रता निश्चित केली आहे. यामुळे यापुढे अशा ठिकाणी नागरिकांची 50 टक्केच क्षमता उपयोगात येईल. शिवाय, दोन डोस घेतल्याखेरीज त्यांना तिथे प्रवेशही मिळणार नाही. जिल्हाधिकार्यांचे हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. परंतु, या प्रयत्नांना अधिकाधिक यश मिळविण्यासाठी आचारसंहितेचे पालन आवश्यक आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार
महत्त्वाचा ठरतो. लोकप्रतिनिधींनी आवाहन केले, तर नागरिक शिस्तीच्या वळणावर येऊ शकतात. परंतु, लोकप्रतिनिधीच शिस्तीचे वळण सोडून गेले, तर आचारसंहितेचे पालन करणार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो. यातून बिघडणारी शिस्त मात्र जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्याला घातक जशी ठरू शकते.
जिल्ह्यात 5,796 नागरिकांचा बळी
देशात दर 10 हजार लोकसंख्येमागे कोरोना मृत्यूच्या संख्येत कोल्हापूर अव्वल स्थानावर आहे. आजपर्यंत जिल्ह्यात 5,796 नागरिकांचा कोरोनाने बळी गेला आहे. याचा विचार करता आता नव्या धोक्याला सामोरे जाताना राजकीय कार्यक्रमांवर सर्वप्रथम टाच आणण्यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य आवश्यक आहे. राजकीय उत्सव कोल्हापूरला परवडणारे नाहीत, याचे भान राखण्याची गरज आहे.
मास्क उतरला
केवळ लोकप्रतिनिधींच्या खांद्यावरच आचारसंहिता पालनाचे जोखड ठेवून नागरिकांना आपली सुटका करून घेता येणार नाही. सर्वसामान्य नागरिकांचीही तितकीच जबाबदारी आहे; पण दुर्दैवाने आज कोल्हापुरात नागरिकांच्या तोंडावरील मास्क गळ्यावर उतरला आहे. हँड सॅनिटायझर ही वस्तू सार्वजनिक ठिकाणातून गायब झाली आहे. नागरिक बिनधास्तपणे गर्दी करताना दिसताहेत.
हेही वाचा