Sangli Lok Sabha Election | विशाल पाटील यांची अखेर बंडखोरी; आज शक्तिप्रदर्शन

Sangli Lok Sabha Election | विशाल पाटील यांची अखेर बंडखोरी; आज शक्तिप्रदर्शन
Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवार, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील आज, मंगळवारी शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठीची सर्व सज्जता त्यांच्या समर्थकांनी जोरदारपणे केलेली आहे. संपूर्ण जिल्ह्यातून काँग्रेस कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्येने सांगलीत दाखल होतील आणि शक्तिप्रदर्शन करतील, असे नियोजन आहे. (Sangli Lok Sabha Election)

विशाल पाटील यांनी सोमवारी अपक्ष व काँग्रेस पक्षाकडून एक, असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. आज सकाळी ते शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी 9.30 वाजता गणपती मंदिरामध्ये दर्शन घेऊन कार्यकर्ते पदयात्रा काढणार आहेत. त्यानंतर थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरल्यानंतर काँग्रेस भवनसमोर सभा होईल.

काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते नागपूरला; महाआघाडीच्या मेळाव्यास अनुपस्थिती

दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ येथे झालेल्या मेळाव्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील नागपूरला गेले आहेत. काँग्रेसचे नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्याशी ते उमेदवारीबाबत चर्चा करणार आहेत.

महाविकास आघाडीने सांगली मतदारसंघ शिवसेनेला सोडला आहे, मात्र काँग्रेसने त्यावरील दावा सोडलेला नाही. त्यामुळे मेळाव्याकडे कोणी आले नाही. सांगलीतील वस्तुस्थिती तपासून घ्यावी, भाजपचा पराभव हे मुख्य लक्ष्य ठेवावे आणि काँग्रेसला उमेदवारी द्यावी, अशी मागणी आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी पक्षाकडे पुन्हा एकदा केली आहे.

विशाल पाटील यांच्याकडून देव-देवतांचे दर्शन, नेत्यांना अभिवादन

विटा ः विशाल पाटील यांनी देव-देवतांचे दर्शन घेतले. तसेच नेत्यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादनही केले. खानापूर तालुक्यातील आमदार संपतराव माने, आमदार हणमंतराव पाटील यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. आमदार अनिलराव बाबर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान, पद्माळे येथील ग्रामदेवतांचेही दर्शन घेतले. दादा घराण्याची ही परंपरा आहे. (Sangli Lok Sabha Election)

शेवटच्या दिवसापर्यंत आशा

19 एप्रिलला अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीमध्ये बदल होण्याची अपेक्षा त्यांना आहे. बंडखोरीबाबतचा निर्णय काँग्रेसच्या निर्णयावर अवलंबून असेल. त्याविषयी 22 एप्रिलच्या अगोदर निर्णय घेतला जाईल, असे त्यांच्या गोटातून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news