सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आज, सोमवारी (दि. 15 ) होणार्या मेळाव्यावर काँग्रेसचे नेते बहिष्कार टाकणार आहेत. भाजपचे नेते व माजी आमदार विलासराव जगताप हे काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या पाठीशी राहणार असून, ते आज जत येथे मेळावा घेऊन त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत.
जिल्ह्यात काँग्रेसची मोठी ताकद असतानाही महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी नाराजी आहे. काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले असून विशाल पाटील यांनी निवडणूक रिंगणात उतरावे, अशी मागणी होत आहे. त्यामुळे विशाल पाटील हे उद्या, मंगळवारी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महाविकास आघाडीच्या मेळाव्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यासह त्यांच्या गटाचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनाही या मेळाव्यासाठी निमंत्रित केले आहे.
याबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत म्हणाले, महाविकास आघाडीच्या मेळाव्यासाठी आम्हाला फोनवरून निरोप आलेला आहे. मात्र आम्ही या मेळाव्याला अनुपस्थित राहणार आहे. काँग्रेस पक्षाकडून आम्हाला उमेदवारी मिळेल याची अजूनही अपेक्षा आहे.
भाजपचे नेते व माजी आमदार विलासराव जगताप हे खासदार संजय पाटील यांच्यावर नाराज आहेत. ही नाराजी त्यांनी उघडपणे जाहीर करीत, आम्ही त्यांना मदत करणार नाही, असे सांगितले आहे. जनतेत खासदार पाटील यांच्याविषयी नाराजी आहे. काही नेते नुरा कुस्ती करून लोकांना उल्लू बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आम्ही जनतेबरोबर राहणार आहोत.
काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे उमेदवारीसाठी बरेच दिवस मुंबईत होते. त्यांनी प्रचारासाठी भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत. त्यांनी रविवारी कवठेमहांकाळ, जत, खानापूर तालुक्यात भेट देऊन पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली.
माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांची भेट घेऊन, त्यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन मुंबईत भेटून केले होते. त्यानंतर सांगलीत पुन्हा दोन्ही नेत्यांमध्ये यासंदर्भात चर्चा झाली.
खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना भेटून, महाविकास आघाडीच्या पाठीशी राहण्याची विनंती केली होती. त्यावेळी घोरपडे यांनी स्पष्ट शब्दात निवडणुकीविषयी वस्तुस्थिती सांगितली होती. त्यांनीही विशाल पाटील यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली असून, बैठका सुरू केलेल्या आहेत.