आता लढायचं, जनतेच्या कोर्टात! सांगलीची जागा ठाकरेंकडे गेल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा निर्धार | पुढारी

आता लढायचं, जनतेच्या कोर्टात! सांगलीची जागा ठाकरेंकडे गेल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा निर्धार

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगली लोकसभेची जागा अखेर ठाकरे शिवसेनेला जाहीर झाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते मंगळवारी संतप्त झाले. सांगलीत काँग्रेस समितीजवळ एकत्र येऊन कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आता अपक्ष लढायचं… जनतेच्या कोर्टात, असा निर्धार कार्यकर्ते व्यक्त करीत होते. सांगलीची उमेदवारी काँग्रेसचे विशाल पाटील यांना मिळेल, ही आशा फोल ठरली. सांगलीपासून मुंबई आणि दिल्लीपर्यंत अनेक प्रयत्न करूनही सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक बनले. सांगलीत काँग्रेस समितीजवळ ते एकत्र आले आणि त्यांनी रोष व्यक्त केला.

‘एकच पक्ष, विशाल पक्ष’, ‘विशाल पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोेषणा सुरू झाल्या. बघता बघता काँग्रेस समिती आणि तेथेच असलेल्या विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर नेते, कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली. माजी मंत्री, आमदार डॉ. विश्वजित कदम, विशाल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील या पाच नेत्यांनी एकत्र येऊन विशाल पाटील यांची अपक्ष उमेदवारी जाहीर करावी, अशी आग्रही मागणी कार्यकर्ते करू लागले. माजी उपमहापौर उमेश पाटील, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज सरगर, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष हर्षद कांबळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. एल. रजपूत, जिल्हा बँकेचे संचालक शशिकांत नागे, बिपीन कदम, संजय कांबळे, नगरसेवक
तौफिक शिकलगार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पृथ्वीराज पाटील म्हणाले, सांगली लोकसभा उमेदवारीबाबत महाविकास आघाडीचा निर्णय धक्कादायक आहे. केवळ काँग्रेसच नव्हे, तर सर्वसामान्य जनता, मतदार यांचीही अपेक्षा सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी अशीच आहे. मतदारसंघात ठाकरे शिवसेनेची ताकद किती आहे, हे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांबरोबरच सर्व जनतेला माहिती आहे. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांपैकी काँग्रेसची हमखास विजयाची जागा ही सांगलीची आहे. तरीही वेगळा निर्णय झाला. झालेला निर्णय हा स्वल्पविराम आहे, पूर्णविराम नाही. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांनी जाहीर केलेले त्यांचे उमेदवारही नंतर बदलले आहेत. त्यामुळे सांगलीची उमेदवारी काँग्रेसला मिळेल, याबाबत आम्ही अजूनही आशादायी आहोत.

पी. एल. रजपूत म्हणाले, सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये प्रथमच मोठी समेट झाली आहे. सर्व नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे काँग्रेस बळकट झाली आहे. सांगलीत काँग्रेसचा विजय निश्चित होता, पण विशाल पाटील यांना उमेदवारी मिळू नये, असा प्रयत्न काहींकडून झाला. वसंतदादा घराणे संपवण्याचे काहींचे षड्यंत्र दिसते. सांगलीची उमेदवारी काँग्रेसलाच मिळावी.

भाजपचा विजय नको असेल तर माघार घ्या : पृथ्वीराज पाटील

पृथ्वीराज पाटील म्हणाले, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगली जिल्ह्याचा ग्राऊंड रिपोर्ट घेतला आहे. सांगलीत भाजपचा विजय व्हायला नको असेल, तर ही जागा काँग्रेसला सोडावी.

राऊत यांच्याकडून सांगलीचा दोन वेळा उल्लेख : काँग्रेस कार्यकर्ते संतप्त

शिवसेनेकडील मतदारसंघांची नावे जाहीर करताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगलीचा उल्लेख दोनदा करीत पवित्रा स्पष्ट केला. त्यावरून इकडे सांगलीत काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आणि ‘एकच पक्ष विशाल पक्ष’, अशी घोषणाबाजी सुरू झाली.

आज, उद्या नेत्यांची चर्चा शक्य

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, सांगलीच्या जागेबाबत वरिष्ठांशी चर्चा चालू आहे. काँग्रेसचे नेते, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, जयश्रीताई पाटील व मी, असे आम्ही पाचजण एकत्र चर्चा करणार आहोत. ही चर्चा शक्यतो बुधवारी, 9 एप्रिलला किंवा गुरुवारी, 10 एप्रिलला होण्याची शक्यता आहे. आम्ही सगळे मिळून विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबत एक-दोन दिवसात निर्णय जाहीर करू.

कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेणार ः सावंत

आमदार विक्रम सावंत यांनी जत येथे सांगितले की, जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची, पदाधिकार्‍यांची बैठक लवकरच होईल. कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी स्वतंत्रपणे नियोजन केले जाईल.

राष्ट्रवादी आघाडीचा धर्म पाळेल : संजय बजाज

राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले, महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा ठाकरे शिवसेनेला गेली आहे. सांगलीत राष्ट्रवादी पक्ष महाविकास आघाडीचा धर्म पाळेल.

Back to top button