Lok Sabha Election 2024 : मी एका मैदानात दोन कुस्त्या करणारा पैलवान : संजय पाटील | पुढारी

Lok Sabha Election 2024 : मी एका मैदानात दोन कुस्त्या करणारा पैलवान : संजय पाटील

सांगली; पुढारी वृत्तसेवा : मी एका मैदानात दोन कुस्त्या करणारा पैलवान आहे. सांगली लोकसभा निवडणुकीच्या मैदानात दोन कुस्त्या झाल्या तर चांगलेच आहे, असे वक्तव्य भाजपचे उमेदवार खासदार संजय पाटील यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दि. 18 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

संजय पाटील म्हणाले, भाजप नेत्यांनी तिसर्‍यांदा माझ्यावर विश्वास दाखविला आहे. महाराष्ट्रातील पहिल्या यादीतच माझी उमेदवारी जाहीर झाली आहे. निवडणुकीपुरतीच धामधूम करायची माझी प्रवृत्ती नाही. सातत्याने लोकांच्या संपर्कात राहिल्याने मला कोणतीही धावपळ करण्याची गरज नाही. विकास कामांच्या जोरावर जनताजनार्दनाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे.

राऊत म्हणजे उचलली जीभ..!

लोकसभेच्या दोन टर्ममध्ये केलेल्या कामांवरच पक्षाने मला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. राऊत यांची टीका म्हणजे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, असा प्रकार आहे. त्यांनी माझे प्रगतिपुस्तक पाहिले असते, तर माझ्याविरोधी बोलायचे धाडस केले नसते. राऊत यांनी सांगलीत येऊन उमेदवारीचा प्रश्न सलोख्याने सोडवायला हवा होता, मात्र त्यांनी जी भाषा वापरली, ती डिवचण्याची होती. त्यामुळे त्यांचा प्रश्न सुटेल, असे वाटत नाही. राजकारणाची भाषा वापरण्यासाठी ते आले होते. मैदान सुरू झाल्यानंतर राऊत यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुराव्यासह दिली जातील, असेही त्यांनी सांगितले.

यांचा बोलवता धनी पुढे येईल

जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा मला विरोध का आहे, हे मी निवडणुकीत प्रचार सभेत स्पष्ट करेन. माझ्या कोंबड्यामुळे उगवले पाहिजे, अशी काहींची इच्छा दिसते. माझ्याशिवाय कार्यकर्त्यांची कामे करू नयेत. धनगर पट्ट्यात इरिगेशन योजना पूर्णत्वाला नेऊ नये, अशी इच्छा काहींची होती. पण मी कोणताही भेद न करता काम करत राहिलो. मतमोजणीनंतर तालुकानिहाय, बुथनिहाय मतदान कळणार आहे. माझा द्वेष करणार्‍या काही व्यक्तींचा बोलवता धनी कोण, हे कालांतराने पुढे येईल, असेही खासदार संजय पाटील म्हणाले.

चंद्रहार नुरा कुस्ती करणारा पैलवान नाही

खासदार पाटील म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी आहेत. चांगला पैलवान उमेदवार दिला आहे. चंद्रहार हा नुरा कुस्ती करणारा पैलवान नाही.

Back to top button