सांगलीच्या जागेबाबत काँग्रेसची भूमिका आज जाहीर होणार | पुढारी

सांगलीच्या जागेबाबत काँग्रेसची भूमिका आज जाहीर होणार

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा अजूनही सुटलेला नाही. शिवसेना ठाकरे गटाने या जागेवर दावा करीत, काँग्रेसचे पक्षश्रेष्ठीच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलची उमेदवारी जाहीर करतील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते आज ( दि. 8) भूमिका जाहीर करणार आहेत.

काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करीत निवडणूक लढविण्याचे संकेत शनिवारी दिले होते. त्यानंतर ते पहिल्यांदाच आज जाहीर बोलतील. त्यांना पक्षाची उमेदवारी मिळणार, अपक्ष लढणार, की मैत्रीपूर्ण लढत होणार, याची उत्सुकता आता सांगलीकरांना आहे. सांगली लोकसभेसाठी भाजपने खासदार संजय पाटील यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. चंद्रहार यांच्या नावाची घोषणा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठा पेच निर्माण झाला. काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील यांनी मुंबई, दिल्ली येथे वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यांना वस्तुस्थिती सांगितली. तरीही नेत्यांकडून त्यांना निर्णय मिळाला नाही. त्यातच खासदार राऊत तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. त्यांनी बैठका, मेळावे घेत काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपच्या नेत्यांवर टीकेचा भडीमार केला. या जागेवर चंद्रहारच निवडणूक लढविणार, आला तर तुमच्याबरोबर, अन्यथा तुमच्याशिवाय, असा इशाराही दिला. आमदार कदम यांच्यावरही त्यांनी टीका केली. गेल्या तीन दिवसांत आरोप-प्रत्यारोपांमुळे जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले.

Back to top button