

सांगली : जिल्ह्याने यावर्षी जीएसटी महसुलाचा बाराशे कोटींचा टप्पा ओलांडला आहे. मात्र जीएसटी वाढीचा टक्का पाहता, सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या मागे, तर देशाच्या पुढे आहे. महसूल वाढीचा सांगलीचा टक्का 13.72, महाराष्ट्र 18.4, तर देशाचा 11.65 आहे. सांगली जिल्ह्यातून मे महिन्यात वाढ मिळाली नाही, तर जून महिन्यात घट झाली आहे. त्याचा परिणाम जिल्ह्याच्या महसूल वाढीच्या टक्क्यावर झाला आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 1243 कोटी रुपये जीएसटी महसूल जमा झाला. 2022-23 मध्ये 1093 कोटी रुपये महसूल जमा झाला होता. 2023 मधील मे महिन्यात महसूल वाढ झाली नाही. जून महिन्यात 2 कोटी रुपये घट झाली. जुलै महिन्यात 9 कोटी रुपये वाढ झाली. अन्य महिन्यांमध्ये 11 कोटी ते 22 कोटी रुपये वाढ आहे. जून, जुलै व ऑगस्ट 2023 मध्ये महिन्याचा महसूल शंभर कोटींच्या आत राहिला.
पावणेसात-सात वर्षांत 479 कोटी रुपयांनी महसूल वाढला आहे. सात वर्षांत जीएसटीच्या कक्षेत नव्याने अनेक वस्तू, सेवांचा समावेश झाला आहे. कराच्या टक्क्यात झालेल्या बदलांचा परिणाम देश, राज्य आणि जिल्ह्याच्या जीएसटी महसूल वाढीवर झाला आहे.
कर चुकवेगिरी करणार्यांविरोधात कारवाई, जीएसटी इंटेलिजन्सची करडी नजर, गैरवापर टाळण्यासाठी ई-वे बिलात केलेली सुधारणा, ई-वे बिलाची तपासणी याचा परिणाम महसूल वाढीवर झालेला आहे. सांगली जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय, सेवांची विशेष वाढ झाली असती तर जिल्ह्यातून जीएसटी महसूल वाढ याहीपेक्षा अधिक झाली असती, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सांगली जिल्ह्याचा जीएसटी महसूल 1243 कोटी, महाराष्ट्राचा महसूल 3 लाख 50 हजार 978 कोटी रुपये, देशाचा महसूल 20 लाख 18 हजार 249 कोटी रुपये आहे. देशाच्या जीएसटी महसुलात महाराष्ट्रातून जमा झालेल्या महसुलाचा हिस्सा 17.39 टक्के, तर राज्याच्या महसुलात सांगली जिल्ह्यातून जमा झालेल्या महसुलाचा हिस्सा 0.35 टक्के इतका आहे. राज्याच्या महसुलात मुंबईतून जमा होणारा महसूल मोठा आहे.
देशात 1 जुलै 2017 पासून जीएसटी लागू झाला. 2018-19 मध्ये सांगली जिल्ह्याचा वार्षिक जीएसटी महसूल 764 कोटी रुपये होता. 2023-24 मध्ये 1243 कोटी रुपये झाला आहे.