कोल्हापूर :जनोव्हा’ लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या सुरू! | पुढारी

कोल्हापूर :जनोव्हा’ लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या सुरू!

कोल्हापूर ः राजेंद्र जोशी : कोरोनावरील पहिली अस्सल भारतीय बनावटीची ‘एम-आरएनए’ व्हॅक्सिन म्हणून ओळखल्या जाणार्‍या लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्यांना सोमवारी कोल्हापुरात प्रारंभ झाला. छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयामध्ये सुरू झालेल्या या चाचण्यांचे नियोजित वेळापत्रकानुसार काम झाले, तर जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात ही लस अत्यावश्यक वापरासाठी नागरिकांच्या सेवेत दाखल होऊ शकते. शिवाय, या चाचणीदरम्यान संपूर्ण जगाला नव्याने भयभीत करणार्‍या ‘ओमायक्रॉन’ या नव्या प्रतिरूपाचा अभ्यासही शक्य आहे.

लस चाचण्यांच्या क्षेत्रात आघाडीच्या समजल्या जाणार्‍या क्रोम क्लिनिकल ट्रायल्स अँड मेडिकल टुरिझम या संस्थेच्या वतीने या चाचण्यांचा कार्यक्रम सुरू झाला आहे. ‘क्रोम’च्या वतीने कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय व इस्लामपूर-सांगली येथील प्रकाश वैद्यकीय महाविद्यालय या दोन साईटस्वर प्रत्येकी 250 स्वयंसेवकांवर या चाचण्या घेण्यात येणार आहेत. कोल्हापुरात या चाचण्यांसाठी 10 स्वयंसेवकांची नोंद झाली आहे. स्वयंसेवकांना प्रत्यक्ष लसीचे डोस देऊन सुरुवात झाली.

पुण्याच्या जिनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स या कंपनीने ही लस बनविली आहे. या चाचण्यांदरम्यान जिनोव्हाने बनविलेली लस आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी व अ‍ॅस्ट्राझेनेका या बहुराष्ट्रीय कंपनीच्या संयुक्त प्रयत्नातून बनविलेली ‘कोव्हिशिल्ड’ लस यांचा तुलनात्मक अभ्यास होतो आहे. या लसीचा पहिला टप्पा जून 2021 मध्ये सीपीआरमध्ये घेण्यात आला. या टप्प्यात 58 स्वयंसेवकांवर अभ्यास करण्यात आला होता.

सप्टेंबरमध्ये 72 स्वयंसेवकांवर दुसर्‍या टप्प्याचा अभ्यास करण्यात आल्यानंतर तिसर्‍या टप्प्याचे नियोजन करण्यात आले आहे.
देशभरातील एकूण 30 वैद्यकीय महाविद्यालयांच्या साईटस्वर या चाचण्या घेण्यात येणार आहेत. यामध्ये ‘जिनोव्हा’ व ‘कोव्हिशिल्ड’ या दोन लसींच्या चाचण्यांसाठी प्रत्येकी 2 हजार 250 असे एकत्रित 4 हजार 500 स्वयंसेवक सहभागी होतील.

याकरिता अद्याप कोरोनावरील कोणतीही लस न घेतलेला आणि रक्तामध्ये कोरोनाची प्रतिपिंडे नसलेला, मोठ्या विकाराने मुक्त स्वयंसेवक पात्र असणार आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये या लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासण्यात आल्यामुळे तिसर्‍या टप्प्यातील निष्कर्ष अनुकूल आल्यास जिनोव्हाच्या या लसीला अत्यावश्यक वापरासाठी अनुमती मिळू शकते. जगभरात पुन्हा निर्माण होत असलेल्या कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर जिनोव्हाच्या लसीची तिसर्‍या टप्प्यातील चाचणी याद़ृष्टीने महत्त्वाची समजली जाते आहे.

 

  • देशातील एकूण 30 साईटस्वर 4,500 स्वयंसेवक होणार सहभागी
  • चाचण्यांदरम्यान ‘जिनोव्हा’ व ‘कोव्हिशिल्ड’ या दोन ‘एम-आरएनए’ लसींचा होणार तुलनात्मक अभ्यास
  • जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात लसीचा अत्यावश्यक वापर शक्य?
  • ‘ओमायक्रॉन’च्या प्रतिरूपाचा अभ्यास शक्य

Back to top button