Sangli Drugs Racket | परवीना भाभीच्या तस्करीमुळे सांगलीतील ड्रग्ज अड्ड्याचा पर्दाफाश  | पुढारी

Sangli Drugs Racket | परवीना भाभीच्या तस्करीमुळे सांगलीतील ड्रग्ज अड्ड्याचा पर्दाफाश 

दिलीप भिसे

इरळी (ता. कवठेमहंकाळ) : कुर्ल्यातील परवीना शेख (भाभी) 16 फेब—ुवारीला ड्रग्जसाठ्यासह मुंबई क्राईम बँ्रचच्या हाताला लागली. पाठोपाठ साजिद शेख मिरा रोडला जेरबंद झाला. सुरतमधील इजाज अन्सारी आणि आदिल बोहरा यांचा सहभाग पक्का झाला. चौकशीत कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रवीण ऊर्फ नागेश शिंदे आणि वासुदेव जाधव हे एमडी ड्रग्जनिर्मिती व तस्करी उलाढालीचे मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यानंतर सांगली कनेक्शनचा पर्दाफाश झाला. प्रवीण शिंदे, जाधवसह टोळक्यांच्या कारनाम्याने इरळीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि दुष्काळी टापूही कमालीचा हादरला आहे. (Sangli Drugs Racket)
कैक वर्षे नैसर्गिक आपत्तीशी धैर्याने तोंड देत लेकरा-बाळांना शिकून शहाणे करणार्‍या दुष्काळग्रस्तांसमोर ड्रग्ज तस्करीचे मोठे संकट चालून आले आहे की काय, अशी भीती सार्‍यांच्याच मनात निर्माण झाली आहे. भविष्यात तरुणाईसमोर एक नवे संकटच उभे ठाकले आहे. इरळी हद्दीत ‘चोरी चोरी… छुपके छुपके’ सुरू असलेल्या ड्रग्जनिर्मितीच्या अड्ड्यामुळे किती निष्पाप तरुणांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली, हे दैवच जाणो!

टोळक्यांच्या कारनाम्याने इरळीसह पंचक्रोशीला धक्का

कवठेमहांकाळनंतर नांगोळे, लंगरपेठ, ढालेवाडीनंतर काही अंतरावर असलेल्या इरळी-डोर्ली रस्त्यावर गुजले मळ्यात चार दिवसांपूर्वी मुंबईतील पोलिस पथकाने वासुदेव जाधव याच्या शेतातील खोलीवर छापेमारी करून ड्रग्जनिर्मिती अड्डा उद्ध्वस्त केला. गावात काय घडतेय, याचा कोणाला काही पत्ता नव्हता. दुपारनंतर पोलिसांचा छापा पडल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली. सायंकाळनंतर मात्र खरी बातमी आली. गावाच्या हद्दीत ड्रग्जनिर्मितीचा अड्डा सुरू असल्याचे समजले. यामुळे इरळी गावासह पंचक्रोशीला धक्का बसला.

असं घडलंच कसं?

प्रवीण शिंदे, वासुदेव जाधवसह त्याच्या साथीदारांना अटक करून मुंबई पोलिसांनी ड्रग्ज निर्मिती करणार्‍या अड्ड्याचा भांडाफोड केल्याचे तसेच 245 कोटींचा ड्रग्जसाठा जप्त केल्याच्या बातमीने सारा परिसर कमालीचा हादरला. गावातल्या पोरांचं एवढं मोठं धाडस अन् एवढं मोठं कनेक्शन… चार दिवसांपासून गावातील चौकाचौकांत, गावकट्ट्यावर एकच चर्चा… असं घडलंच कसं..?

नवी दिल्लीपासून कोलकाता, सुरत, मुंबई, इरळीपर्यंत कनेक्शन

मुंबई, पुणे पोलिसांनी सांगली जिल्ह्यात दोन ठिकाणी छापेमारी करून स्थानिक ड्रग्ज तस्करांचा बुरखा फाडला असला, तरी या रॅकेटमध्ये आंतरराष्ट्रीय माफिया टोळ्यांचा सहभाग टप्प्याटप्प्याने उघड होत आहे. इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथील ड्रग्जनिर्मितीच्या अड्ड्यामागे नवी दिल्ली, कोलकाता, सुरत, मिरा रोड, इरळीपर्यंतची साखळी गुरफटली आहे. कोलकाता, बांगला देशमार्गे आणखी कोठेपर्यंत एमडी ड्रग्जची तस्करी होणार होती, याचाही लवकरच छडा शक्य आहे.

तस्करी साखळी अन म्होरक्याचे प्रशिक्षण

मुंबई क्राईम ब—ँच विशेष पथकाने एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी कुर्ल्यातील एका महिलेसह 10 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामध्ये परवीना शेख (वय 35) हिचा ड्रग्ज तस्करीतील कारनाम्यांची माहिती लागताच तिला क्राईम ब्रँचच्या पथकाने 16 फेब—ुवारी 2024 रोजी 12 लाख 20 हजार रुपये किमतीचा 641 ग्रॅम ड्रग्जसाठा आणि दागिन्यासह अटक केली. तिच्या चौकशीतून मुंबईतील मिरा रोड येथील तिचा सहकारी साजीद शेखला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे ड्रग्जसाठा असल्याची माहिती पुढे आली. त्याच्या अड्ड्यावरील छापेमारीत पथकाने 6 कोटी रुपये किमतीचा तीन किलो ड्रग्जसाठा आणि रोकड हस्तगत केली. साजिदच्या चौकशीत गुजरात (सुरत) कनेक्शन पुढे आले. मुंबई क्राईम बँ्रच पथकाने सुरत येथील इजाज अन्सारी आणि आदिल बोहरा या संशयितांना ताब्यात घेतले. विशेष पथकाने आजवर जेरबंद केलेल्या बहुतांश तस्करांच्या चौकशीतून सांगली कनेक्शनचा उलगडा झाला.

म्होरक्याचे मिरा रोडला वास्तव्य

 ड्रग्ज तस्करीतील मुख्य संशयीत प्रवीण ऊर्फ नागेश शिंदे हा मूळचा कवठेमहांकाळ तालुक्यातील; पण अलीकडच्या काळात त्याचे मुंबईत मिरा रोडला वास्तव्य आहे. तीन-साडेतीन वर्षांपूर्वी त्याने उत्तर प्रदेशात जाऊन एमडी ड्रग्ज बनविण्याचे प्रशिक्षण घेतल्याची धक्कादायक माहितीही मुंबई क्राईम ब्रँचच्या चौकशीतून पुढे आली आहे.
(उत्तरार्ध )

राज्य नव्हे, केंद्रीय यंत्रणाही खडबडून झाल्या जाग्या !

सांगली जिल्ह्यातील कुपवाड पाठोपाठ अवघ्या 34 व्या दिवशी कवठेमहाकांळ तालुक्यातील इरळी येथील निर्जन माळरानावर द्राक्षबागेलगत 245 कोटी किमतीचा एमडी ड्रग्जसाठा मुंबई क्राईम ब—ँच पथकाच्या हाताला लागल्याने राज्य गृह मंत्रालयासह केंद्रीय गृह मंत्रालयानेही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणाही खडबडून जाग्या झाल्या आहेत.

स्थानिक यंत्रणांच्या बेफिकिरीची उच्चस्तरीय दखल

कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याची स्थानिक यंत्रणा कार्यरत असताना इरळी येथील द्राक्ष बागेलगत शेतात सुरू असलेल्या एमडी ड्रग्ज निर्मिती आणि तस्करीची खबरबात का नसावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कुपवाड (ता. मिरज) पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर फेब्रुवारीमध्ये 300 कोटींचा ड्रग्जसाठा आढळून आला. प्रभारी अधिकार्‍यांसह वरिष्ठांच्या बेफिकिरीची उच्चस्तरावर दखल घेण्यात आल्याचे समजते. (Sangli Drugs Racket)

Back to top button