लोकसभा लढविण्यावरून मराठा समाजात मतभेद; आज पुन्हा बैठक

लोकसभा लढविण्यावरून मराठा समाजात मतभेद; आज पुन्हा बैठक
Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक लढविण्यावरूनच सकल मराठा समाजात मतभेद आहेत, हे गुरुवारी झालेल्या बैठकीत स्पष्ट झाले. तरी सुद्धा सांगली लोकसभा मतदार संघातून सातजणांनी, तर हातकणंगले मतदार संघातून तिघांनी समाजातर्फे निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. दरम्यान, निवडणुकीसंदर्भात काय भूमिका घ्यायची, जरांगे पाटील यांना अहवाल पाठवायचा, की नाही पाठवायचा यासंदर्भात शुक्रवारी (दि. 29) पुन्हा बैठक होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाची मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत अंतरवाली सराटी येथे बैठक झाली होती. त्यात निवडणूक लढविण्यासंदर्भात गाव व जिल्हा पातळीवर बैठका घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने येथील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मिरज, तासगाव, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, वाळवा, खानापूर, शिराळा, सांगली व हातकणंगले लोकसभा मतदार संघातील मराठा समाजाचे बांधव उपस्थित होते. यात नितीन चव्हाण, प्रा. पद्माकर जगदाळे, अमृतराव सूर्यवंशी, डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर, महेश खराडे, युवराज शिंदे आदी उपस्थित होते.

बैठकीत काहींनी सकल मराठा समाजाने एकजूट होऊन लोकसभेसाठी उमेदवार द्यावा, अशी भूमिका मांडली. दुसर्‍या बाजूला काहींनी मराठा समाज संघटनेत निवडणुकीत उघड भूमिका घेऊ नये. निवडणुकीतील मुख्य उमेदवार हे मराठा समाजातीलच आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या इच्छेनुसार भूमिका घ्यावी, असे मत काहींनी मांडले. त्यामुळे बैठकीत निवडणूक लढवण्यावरून मतभेद असल्याचे पुढे आले. दरम्यान, भूमिका ठरविण्यासाठी व्यापक बैठक घेण्याचे व त्यासाठी शुक्रवारी बैठक घेण्यात येणार असल्याचे नितीन चव्हाण यांनी सांगितले. तसेच बैठकीचा अहवाल जरांगे यांना अंतरवाली सराटी येथे पाठवण्यात आल्याचे डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.

जरांगेनी सांगलीतून निवडणूक लढवावी

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे यांनी जोरदार लढा उभारला. सरकारविरोधात आवाज उठवला. त्यामुळे मनोज जरांगे यांनी सांगलीतूनच निवडणूक लढवावी, तसा अहवाल पाठवावा, अशी मागणी काहींनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news