सांगलीतून विशाल पाटील यांची बंडखोरी की मैत्रीपूर्ण लढत? | पुढारी

सांगलीतून विशाल पाटील यांची बंडखोरी की मैत्रीपूर्ण लढत?

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सध्याचा राजकीय पेच पाहता, सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवार विशाल पाटील मैत्रीपूर्ण लढणार की बंडखोरी करीत अपक्ष लढणार, याचीच उत्सुकता आहे. मैत्रीपूर्ण की बंडखोरी याबाबतचा निर्णय येत्या चार दिवसांत घेतला जाईल, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सांगितले.

सांगलीच्या जागेसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस दोन्हीही पक्ष आग्रही आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यावर महाविकास आघाडीच्या मुंबईत गुरुवारी झालेल्या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, बैठकीत सांगलीच्या जागेवर कोणताच निर्णय झाला नाही. त्यामुळे ही जागा शिवसेनेकडून लढवली जाणार हे स्पष्ट झाले आहे. आता विशाल पाटील म्हणजेच काँग्रेसच्या भूमिकेकडे लोकांचे लक्ष आहे.

दरम्यान, नाराज असल्याने काँग्रेस नेते नाना पटोले बैठकीस उपस्थित नव्हते. सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील जागेवरून काँग्रेस व सेना यांच्यातील संघर्ष दिवसे न् दिवस वाढत आहे. कोणत्याही स्थितीत सांगलीची जागा काँग्रेसने लढविण्याचा निर्णय घेण्याचे आवाहन आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाला केले आहे. मतदारसंघावर काँग्रेसचा हक्क असताना महाविकास आघाडीतील ठाकरे शिवसेनेने परस्पर उमेदवार जाहीर केला, हे आम्हाला मान्य नाही, असे दिल्लीदरबारी सांगितले. मात्र त्यांना श्रेष्ठींकडून कोणतेही आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे पृथ्वीराज पाटील वगळता जिल्ह्यातील अन्य नेते सांगलीत परत आले आहेत.

विशाल पाटील यांची गाणे प्रसिद्ध करीत दावेदारी

विशाल पाटील यांनी समाजमाध्यमावर हिंदी गाण्याच्या ओळी प्रसिद्ध केल्या आहेत. यामध्ये म्हटले आहे,

रोके तुझको आँधियाँ,
या जमीन और आसमान,
पायेगा जो लक्ष्य है तेरा,
लक्ष्य तो हर हाल में पाना है…

Back to top button