राष्ट्रवादीतील भाजपप्रेमींमुळे मला अडथळे; राजू शेट्टी यांचा जयंत पाटलांवर आरोप

राष्ट्रवादीतील भाजपप्रेमींमुळे मला अडथळे; राजू शेट्टी यांचा जयंत पाटलांवर आरोप

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : भाजपचा खरोखरच पराभव व्हावा असे महाविकास आघाडीला वाटत असेल, तर त्यांनी हातकणंगले मतदारसंघात मला पाठिंबा द्यावा. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीत जाणार नाही. शिवसेना पक्ष पाठिंब्यासाठी सकारात्मक आहे. मात्र अजूनही राष्ट्रवादी पक्षात काही भाजपप्रेमी लोक आहेत. तेच माझ्या पाठिंब्यामध्ये अडथळे आणत आहेत, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयंत पाटील यांचे नाव न घेता येथे पत्रकारांजवळ केला.

ते म्हणाले, एप्रिल 2021 मध्ये महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणीने घेतला. त्यामुळे आघाडीत पुन्हा जायचे असेल, तर राज्य कार्यकारिणीची बैठक बोलवावी लागेल. सध्या तरी आघाडीत जाण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विचार नाही. शेतकरीविरोधी धोरणे राबविणार्‍या भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही आघाडीसोबत राहायला तयार आहे. त्यांनी पाठिंब्याचा लवकर निर्णय घ्यावा. नाही तर स्वबळावर आम्ही निवडणूक लढविण्याची तयारी केलीच आहे. लढाई आम्हाला नवीन नाही.

ते म्हणाले, हातकणंगले मतदारसंघ शिवसेनेकडे राहील. शिवसेनेने येथे उमेदवार न देता मला पाठिंबा द्यावा, यासाठी मी दोनदा उध्दव ठाकरेंना भेटलो आहे. त्यांनी पाठिंब्याची तयारीही दाखवली होती. मात्र महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी पक्षात अजूनही काही भाजपप्रेमी लोक आहेत. ते आघाडीत राहून अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करीत आहेत. हेच लोक मला शिवसेनेचा पाठिंबा मिळू नये यासाठी प्रयत्नशील आहेत. आघाडीचा पाठिंबा मिळाला नाही तरी, आपण अपक्ष मैदानात उतरणार आहोत. आम्ही निवडणुकीचा प्रचारही चालू केला आहे. जनमत भाजपच्या विरोधात असल्याने मतदारसंघात जनतेचा मला चांगला पाठिंबाही मिळत आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर निश्चितच आपण मैदान जिंकू.

कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, अ‍ॅड. एस. यू. संदे, भागवत जाधव, धैर्यशील पाटील, मकरंद करळे, पोपट मोरे, जगन्नाथ भोजले, संतोष शेळके, शिवाजी पाटील, रविकिरण माने, आप्पासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

6 जागा लढविण्याची तयारी

ते म्हणाले, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, बुलडाणा, परभणी या सहा जागा लढविण्याची स्वाभिमानीने तयारी केली आहे. मात्र निवडणूक लढविण्याचा निर्णय त्या त्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांवर सोपविला आहे.

शरद पवारही भाजप नेत्यांना भेटतात…

शेट्टी म्हणाले, 2013 पासून आम्ही भाजपच्याविरोधात लढत आहोत. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आम्ही युतीत सहभागी झालो होतो. मात्र भाजपने शेतकरीविरोधी कायदे केल्याने आम्ही युतीतून बाहेर पडलो. मी भाजपच्या नेत्यांनाही भेटलो, असे आता काहीजण म्हणत आहेत. मला कोणाला चोरून भेटायची गरजच नाही. कोणाला भेटलो असेन, तर मतदारसंघातील कामासाठी भेटलो असेन. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारही भाजपच्या नेत्यांना सारखे भेटत असतातच की!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news