Lok Sabha Election 2024 : सांगलीच्या जागेवरून सेना-काँग्रेसमध्येच जुंपली | पुढारी

Lok Sabha Election 2024 : सांगलीच्या जागेवरून सेना-काँग्रेसमध्येच जुंपली

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीच्या सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यातील वाद विकोपाला गेलेला आहे. तो आणखी वाढण्याचीच चिन्हे आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दोन्हीही पक्ष सांगलीची जागा आम्हीच लढविणार, या निर्णयावर ठाम आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांमध्येच जुंपली आहे. भाजपचं ठरलंय, तर महाविकास आघाडीचं ठरेचना, अशी स्थिती आहे.

सांगलीची महाविकास आघाडीची जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यासंदर्भात दिल्लीत शरद पवार, जयंत पाटील व काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांच्या उपस्थितीत निर्णय झाला आहे, असा दावा शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केला. त्याशिवाय काँग्रेस नेते नाना पटोले यांनी संयमाने बोलले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. लोकसभा निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागू झाली आहे. भाजपतर्फे खासदार संजय पाटील यांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरू केली आहे. या स्थितीत महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी उमेदवारीचा शब्द घेत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळी ठाकरे यांनी चंद्रहार यांच्या उमेदवारीची अप्रत्यक्ष घोषणा करीत, पैलवान आता मशाल घेऊन दिल्लीत जातील, असे जाहीर केले होते. त्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी मुंबईत धाव घेतली. त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भेटून सांगलीच्या जागेसाठी आग्रह धरला आहे. त्यातून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून हा मतदारसंघ आम्ही सोडणार नाही. शिवसेना ठाकरे गटाची जिल्ह्यात फार ताकद नाही. वेळ आल्यास टोकाची भूमिकाही घेऊ, असे विधान काँग्रेस आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केले आहे. काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांना निवडून आणणारच, असा निर्धार त्यांनी पुन्हा पुन्हा व्यक्त केला आहे.

Back to top button