Sangali New: करगणी यात्रेत पाच कोटींची उलाढाल; १० हजारहून अधिक जनावरांची आवक | पुढारी

Sangali New: करगणी यात्रेत पाच कोटींची उलाढाल; १० हजारहून अधिक जनावरांची आवक

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा: करगणी ता.आटपाडी येथील ग्रामदैवत लखमेश्वराच्या यात्रेत खिलार जनावरांच्या यात्रेत पाच कोटींची उलाढाल झाली. खरसुंडी पाठोपाठ करगणी यात्रेत देखील जनावरांची मोठ्या संख्येने आवक झाली होती. खिलार जनावरांची खरेदी विक्री मोठया प्रमाणात झाली.आज (दि.१३) या यात्रेची सांगता झाली. (Sangali New)

करगणी येथील श्रीरामाची यात्रा महाशिवरात्रीपासून उत्साहात सुरू झाली. पहिले तीन दिवस शेळ्या मेंढ्यांची यात्रा झाली. प्रसिद्ध खिलार जनावरांची यात्रा सोमवारपासून सुरू झाली. जातीवंत खिल्लार जनावरांसाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे. सुरुवातीस व्यापारी आणि हौसेखातर शर्यतीचे बैल पाळणारे शेतकरी खिलार जनावरे घेऊन आले होते. मंगळवारी आणि बुधवारी ही यात्रा मोठी भरली होती. बाळेवाडी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या माळावर पन्नास एकर क्षेत्रात खिलार जनावरांनी यात्रा झाली. बैलगाडीच्या शर्यती सुरू झाल्यापासून खिलार जनावरांच्या यात्रेला उलाढाल वाढली आहे. यात्रेत सांगली, सातारा, सोलापूर आणि कर्नाटक या भागातून शेतकरी खिलार जनावरे घेऊन दाखल झाला होते. जनावरे खरेदीसाठी स्थानिक शेतकऱ्यांबरोबरच पुणे, नगर, सातारा, आंबेगाव, जामखेड, अकोला या भागातून व्यापारी आले होते. (Sangali New)

खिलार खोंडांना ३० हजारापासून ते एक लाख -दोन लाखापर्यंत मागणी झाली.जातिवंत वळूच्या किमती लाखाहुन अधिक होत्या.यात्रेत ग्रामपंचायत आणि बाजार समिती मार्फत पाण्याची आणि दिवा बत्तीची सोय करण्यात आली होती.ग्रामपंचायत,बाजार समिती आणि यात्रा समितीने चोख नियोजन केल्याने यात्रेकरूंची चांगली सोय झाली. (Sangali New)

करगणी येथील यात्रेला चांगला प्रतिसाद लाभला.यात्रेत १० हजारहून अधिक जनावरांची आवक आणि पाच कोटी रुपयांची उलाढाल झाली, अशी माहिती  कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती संतोष पुजारी यांनी ‘दै. पुढारी’ला दिलेल्या माहितीत दिली आहे.

Back to top button