‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन; भाजपचे अनेक नेते, अजित पवार गटाची कार्यक्रमाकडे पाठ | पुढारी

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन; भाजपचे अनेक नेते, अजित पवार गटाची कार्यक्रमाकडे पाठ

शशिकांत शिंदे

सांगली ः ‘शासन आपल्या दारी’ हा सरकारचा कार्यक्रम अखेर इस्लामपूर येथे शुक्रवारी व्यवस्थितपणे पार पडला. मात्र, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते. त्याचबरोबर जिल्ह्यातील भाजपचे अनेक नेते व अजित पवार गटाचे नेते, कार्यकर्ते यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्याची चर्चा उपस्थितांत होती. या भरगच्च कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व त्यांच्या गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख टाळत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

काही दिवसांपासून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा भरगच्च कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात आयोजित केला जातो. सांगली जिल्ह्यात कार्यक्रम घेण्याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा होती. कार्यक्रमाच्या अनेकवेळा तारखाही निश्चित झाल्या. मात्र विविध कारणाने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत होता. सुरुवातीला हा कार्यक्रम कवलापूर येथे घेण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र इस्लामपूर येथे कार्यक्रम घेण्याबाबत शिवसेना (शिंदे गटाचे) कार्यकर्ते आग्रही राहिल्यामुळे अखेर शुक्रवारी इस्लामपूर येथे हा कार्यक्रम आमदार जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार झाला.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या सुमारे आठ हजार लाभार्थींना कार्यक्रमासाठी आणले होते. त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. जिल्हाभरातून शेकडो एसटी बसेस दिमतीला होत्या. त्याशिवाय शिवसेनेच्या शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने गाड्या घेऊन आले होते. त्यामुळे एकच गर्दी झाली होती.

राज्यात बहुतेक ठिकाणी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाले. अनेक ठिकाणी विरोधकही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मात्र इस्लामपूर येथे झालेल्या कार्यक्रमास दोन्ही उपमुख्यमंत्री तर आलेच नाहीत. त्याशिवाय भाजपचे वाळवा, शिराळा तालुके वगळता इतर तालुक्यांतील नेते, कार्यकर्ते यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्याशिवाय अजित पवार गटाचेही कोणी कार्यक्रमास नव्हते. मुख्यमंत्री शिंदे, ना. देसाई यांच्यासह त्यांच्या गटाच्या नेेत्यांनी व्यासपीठावर सुरुवातीस येऊन लोकांना अभिवादन केले. त्यानंतर काही वेळानंतर पालकमंत्री व भाजप नेते आले.

कार्यक्रमात लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था टकाटक होती. उपवास असल्याने राजगिरा लाडू, केळी, खिचडी, ताक, पाणी बाटल्या यांची रेलचेल होती. भर उन्हात नागरिक ख़ाद्यपदार्थांचा आस्वाद घेत होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध योजनांचे कक्ष होते. मात्र यातील काही रिकामे पडले होते. काही कक्षावर केवळ माहितीपत्रके दिली जात होती. काही माहितीपत्रकावर बंद झालेल्या जुन्याच योजनांची माहिती होती. उद्योजकांचेही काही कक्ष रिकामे होते. वरिष्ठांचे आदेश असल्याने अनेक अधिकारी, कर्मचारी इलाज नसल्याने सुट्टी असूनही भर उन्हात कक्षावर बसून होते.

गैरसोयीचे ठिकाण

इस्लामपूर येथे हा कार्यक्रम घेतल्याने जिल्ह्याच्या पूर्व भागातील लोकांना कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणे त्रासाचे ठरले. हा कार्यक्रम सांगलीत आयोजिला असता, तर सर्वांना सोयीचा ठरला असता. त्यामुळे त्यांच्यात नाराजी होती.

पाऊण तासासाठी कोट्यवधीचा खर्च

मुख्यमंत्री शिंदे सभास्थळी 4 वाजून 10 मिनिटांनी आले. त्यात 20 मिनिटे त्यांनी भाषण केले. जेमतेम पाऊण तास हा कार्यक्रम चालला. त्यासाठी आठ दिवसांपासून प्रशासन तयारी करीत होते. जिल्हाभरातून बचत गट व अन्य लाभार्थी महिलांना एस.टी. बसेसमधून आणले होते. अनेक महिला सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मंडपात बसून होत्या. भव्य सभामंडप, मान्यवरांसाठी बैठकव्यवस्था, जेवणावळी, मुख्यमंत्री, मंत्री यांच्यासाठी हेलिपॅड आदी सुविधांवर वारेमाप खर्च केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात दुष्काळ आहे. शेतकरी अडचणीत आहे. अशा स्थितीत ही उधळपट्टी कशासाठी, अशी विचारणा विरोधकांनी समाजमाध्यमातून केली.

निमंत्रण दिले नसल्याचा पवार गटाचा आरोप

शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे कोणीही उपस्थित नव्हते. प्रशासनाकडून या गटाच्या पदाधिकार्‍यांना निमंत्रण दिले नसल्याने उपस्थित राहिलो नसल्याचा आरोप एका पदाधिकार्‍याने केला.

विद्यार्थी नियोजनात

इस्लामपूर येथील महाविद्यालयातील एनएसएस, एनसीसी आदींचे विद्यार्थी, विद्यार्थिनी नियोजनासाठी होते. ते दिवसभर कार्यक्रमाच्या ठिकाणी व परिसरात थांबून व्यवस्था पाहत होते. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशानुसार त्यांना नियुक्त केले होते. या विद्यार्थ्यांचे शिक्षक मात्र उपस्थित नव्हते. तसे विद्यार्थ्यांनी सांगितले.

या भाजप नेत्यांची अनुपस्थिती

जिल्ह्यात भाजपचे नेते, पदाधिकारी सर्वाधिक आहेत. मात्र इस्लामपूर येथील कार्यक्रमाला भाजपचे खासदार संजय पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार व माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी अनुपस्थित होते. याची उपस्थितांत चर्चा होती.

लोकसभा डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम?

लोकसभा निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर व हातकणंगले हे लोकसभेचे मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे आहेत. हा कार्यक्रम हातकणंगले मतदारसंघात पेठवडगाव व इस्लामपूर येथे होता. त्या ठिकाणी खासदार धैर्यशील माने यांना व्यासपीठावर बोलण्याची संधी देण्यात आली होती. त्यामुळे शासनाचा हा कार्यक्रम म्हणजे चुनावी जुमला आहे का, अशी चर्चा होती.

Back to top button