सांगली: अखेर विटा येथील पोल्ट्री ७२ तासांत बंद करण्याचे आदेश | पुढारी

सांगली: अखेर विटा येथील पोल्ट्री ७२ तासांत बंद करण्याचे आदेश

विटा: पुढारी वृत्तसेवा: अखेर विट्याच्या शिवाजीनगरातील रहिवाशी भागातील पोल्ट्री ७२ तासांत बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय कार्यालयाने दिले आहेत. तसेच संबंधित पोल्ट्रींचा पाणी आणि वीज पुरवठा तत्काळ खंडित करा, असे निर्देशही विट्याच्या महावितरण आणि पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे यांनी दिले आहेत.

विट्यातील शिवाजीनगर, शाहूनगर आणि सुतारकी परिसरात रहिवासी क्षेत्रात अनेक पोल्ट्री आहेत. त्यामुळे दुर्गंधीचा आणि माशांचा मोठा त्रास तेथील ३०० ते ४०० कुटुंबांना सहन करावा लागत आहे. याबाबत येथील माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल शितोळे यांनी विटा पालिका, जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व संबंधितांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. याबाबत मुंबई उच्च न्यायालयासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही राहुल शितोळे यांनी दाद मागितली होती.

मागील दोन अडीच वर्षांपासून सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करीत आहेत. गेल्या वर्षी ऐन प्रजासत्ताक दिना दिवशी त्यांनी विट्या च्या महसूल कार्यालयासमोर आंदोलनही केले होते. त्यावर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने आता संबंधित पोल्ट्री बंद करण्याचा हा आदेश जारी केला आहे.

दरम्यान, २७ फेब्रुवारी २० २३ रोजी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या तपासणीदरम्यान पोल्ट्री फार्म संमतीशिवाय सुरू आहे. दुर्गंधी नियंत्रणासाठी पुरेशा उपाययोजना केलेल्या नाहीत, पोल्ट्री मलमूत्रा साठी शास्त्रीय स्टोरेज उपलब्ध करून दिलेले नाहीत, असे आढळून आले. त्यामुळे या पोल्ट्रींचे पाणी आणि वीज पुरवठा तत्काळ खंडित करण्याचे निर्देश प्रदूषण मंडळाचे कोल्हापूर विभागीय प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे यांनी दिले आहेत.

हेही वाचा 

Back to top button