सांगली : ‘हॅण्डबॉल’चे हात ड्रग्ज तस्करीत

सांगली : ‘हॅण्डबॉल’चे हात ड्रग्ज तस्करीत

कुपवाड : 'ड्रग्ज' तस्कर म्हणून उजेडात आलेला आयुब मकानदार (वय 44, रा. बाळकृष्णनगर, कुपवाड) हा 1998 ते 2003 अखेर हॅण्डबॉल प्रशिक्षक होता. हॅण्डबॉल खेळात त्याने राज्य शासनाची प्रशिक्षक परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याने राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत नामवंत खेळाडूंना घडविले. तसेच अनेक पदके प्राप्त केली होती. 2015 मध्ये इस्लामपूर येथे ड्रग्जची तस्करी करीत असताना मुंबई पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले होते.

खेळाची आवड

आयुबचा जन्म गरीब कुटुंबात झाला. त्याचे वडील साखर कारखान्यात रखवालदार होते. लहानपणापासूनच त्याला खेळाची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने एका शैक्षणिक संस्थेतील वसतिगृहात काही काळ नोकरी केली. वडिलांनी कुपवाडमधील बाळकृष्णनगरमध्ये भूखंड घेतला होता. तेथे आयुब कुटुंबासह राहत होता. गतवर्षी त्याच्या आईचे निधन झाले. त्याचा मुलगा महाविद्यालयात, तर मुलगी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. वडील आजही रखवालदार म्हणून काम करतात.

अनेक खेळाडू घडविले!

आयुबने एका शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना हॅण्डबॉलचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. हॅण्डबॉल खेळात अनेक खेळाडू त्याने तयार केले. त्याने घडविलेले खेळाडू राज्यस्तरावर चमकल्याने तो नावा-रूपास आला. हॅण्डबॉल प्रशिक्षक म्हणून काम करण्यासाठी राज्य शासनाची परीक्षा उत्तीर्ण होऊन मान्यता मिळवावी लागते. तो ही परीक्षा उत्तीर्ण झाला. हॅण्डबॉल प्रशिक्षक म्हणून त्याचे काम उत्तम सुरू होते. 2003 नंतर तो संस्थेतून बाहेर पडला. 2011 मध्ये कुपवाड एमआयडीसीतील 'कामुद ड्रग्ज' कंपनीवर छापा पडला. तेथे नशेसाठी वापरण्यात येणारे 'केटामाईन' तयार करण्यात येत होते. तेव्हा एक मेट्रिक टन केटामाईन जप्त करून महसूल गुप्तचर संचालनालयाने कंपनीचा मालक अभिजित कोंडूस्कर याला अटक केली होती.

कोंडूस्करशी मैत्री जोडली!

आयुबची रवींद्र कोंडूस्कर याच्याशी मैत्री जमली. 2015 मध्ये डीआरआयने कस्टम (पुणे) यांच्या सहकार्याने मुंबई-पुणे महामार्गावर एक वाहन इस्लामपूर येथून मुंबईकडे मेफेड्रोनची वाहतूक करीत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे अडवून, नासिरनामक संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडून 50 किलो मेफेड्रोन, ज्याला एमडी किंवा 'म्याव-म्याव' असेही म्हणतात, जप्त केले.

इस्लामपुरात छापा

इस्लामपूर येथील रवींद्र कोंडूसकर याच्या मालकीच्या ओंकार इंडस्ट्रीजमध्ये मेफेड्रोन तयार केले होते. फॅक्टरीची झडती घेतली आणि 355 किलो मेफेड्रोन जप्त केले होते. डीआरआयने आयुबला ड्रग्जची तस्करी करताना रंगेहात पकडले होते. त्यावेळी कंपनीचा मालक रवींद्र कोंडूस्कर व आयुब खान यांना अटक झाली होती.

सायकल ते महागडी कार…

आयुब हॅण्डबॉल प्रशिक्षक म्हणून नोकरी करताना सायकलवरून यायचा. नंतर त्याने जुन्या बुलेटचा वापर सुरू केला. अचानकच तो महागड्या कारमधून फिरू लागला.

स्वयंघोषित उद्योजक…

2011 ते 2015 या कालावधित तो स्वयंघोषित उद्योजक बनला. मोठमोठ्या उद्योजकांबरोबर त्याची ऊठबस सुरू झाली. त्याचा कोणता उद्योग होता, याची चौकशीही कोणी केली नाही. उद्योजकांच्या संघटनेचा तो सभासद बनला. कालांतराने त्याच संघटनेचा सचिव झाला.

संघटनेच्या पदावरून हकालपट्टी…

आयुबला मुंबई पोलिसांनी इस्लामपूर येथे ड्रग्जची तस्करी करीत असताना पकडल्याची बातमी येताच उद्योजक संघटनेने त्याची पदावरून हकालपट्टी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news