कुपवाडमध्ये ३०० कोटींचे ड्रग्ज जप्त; पुणे पोलिसांची कारवाई

कुपवाडमध्ये ३०० कोटींचे ड्रग्ज जप्त; पुणे पोलिसांची कारवाई

Published on

सांगली/कुपवाड; पुढारी वृत्तसेवा : पुणे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व कुपवाड पोलिसांच्या पथकाने कुपवाडमधील स्वामी मळ्यातील एका पत्र्याच्या खोलीवर छापा टाकून 140 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे अडीचशे ते तीनशे कोटी रुपये किंमत आहे. मंगळवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मुख्य तस्कर आयुब अकबरशा मकानदार (वय 44, रा. बाळकृष्णनगर, कुपवाड) याच्यासह तिघांना अटक करण्यात आली.

खोली मालक रमजान हमीद मुजावर (55, नूर इस्लाम मस्जिदजवळ, कुपवाड) व अक्षय चंद्रकांत तावडे (30, बाळकृष्णनगर, कुपवाड) अशी अटक केलेल्या अन्य दोघांची नावे आहेत. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी विश्रांतवाडी, कुरकुंभ व दिल्ली येथे केलेल्या कारवाईत दोन हजार दोनशे कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. त्याचे वजन अकराशे किलो होते. त्या कारवाईत चार संशयितांना अटक केली होती. त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी कुपवाडमधील दोघांची नावे निष्पन्न झाली होती.

पुण्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कुपवाड पोलिसांशी संपर्क साधला. मंगळवारी रात्रीच गुन्हे अन्वेषणचे पथक कुपवाडमध्ये दाखल झाले. जिल्हा पोलिसप्रमुख संदीप घुगे यांची पथकाने भेट घेऊन तपासाबद्दल माहिती घेतली. त्यानंतर कुपवाड पोलिसांची मदत घेऊन पथकाने मध्यरात्री स्वामी मळा परिसरात एका पत्र्याच्या खोलीवर छापा टाकला. खोलीतून 140 किलो ड्रग्जचा साठा जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत अडीचशे ते तीनशे कोटी रुपये आहे. पंचनामा करून ड्रग्ज जप्त केले आहे. मुख्य तस्कर आयुब मकानदारसह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध रात्री उशिरा कुपवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे अन्वेषणचे पथक बुधवारी रात्री उशिरापर्यंत कुपवाडमध्ये तळ ठोकून होते. आणखी काही ठिकाणी ड्रग्ज लपवून ठेवल्याची पथकाला माहिती लागली आहे. त्यानुसार पथक मकानदारकडे चौकशी करीत आहे. त्याच्याकडून काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, पुणे गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक विनायक गायकवाड, कुपवाडचे अविनाश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मिठाच्या पोत्यातून तस्करी

ड्रग्ज तस्करीचे सातत्याने पुणे, सांगली, इस्लामपूर व कुपवाड 'कनेक्शन' निघाले आहे. कुपवाड पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका खोलीत संशयितांनी ड्रग्जचा साठा ठेवला होता. पुणे पोलिसांनी मुळापर्यंत जाऊन तपास केल्याने येथील ड्रग्ज जप्त करण्यात यश आले. संशयित मकानदार हा पोलिसांना संशय येऊ नये, यासाठी मिठाच्या पोत्यातून ड्रग्जची तस्करी करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news