कुरळप; पुढारी वृत्तसेवा : दीड वर्षांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देऊन भाजपमध्ये येण्याची विनंती केली होती. त्यावेळी जयंत पाटील यांनी नकार देत, शरद पवार यांची साथ सोडणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावड्यांवर विश्वास ठेवू नये, असे वक्तव्य राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी केले. कुरळप (ता. वाळवा) येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
पी. आर. पाटील म्हणाले, अजित पवार यांना ज्यांनी आमदार केले, मंत्री केले, त्यांनाच अजित पवार सोडून गेले. अजित पवार यांच्याअगोदर जयंत पाटील यांना देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. उपमुख्यमंत्रीपद मिळवून देण्याची जबाबदारी माझी, असे आश्वासन दिले होते. पण ते भाजपमध्ये गेले नाहीत. आताचे राजकारण दूषित झाले आहे. भाजपकडून शरद पवार यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. जयंत पाटील हे नेहमीच पवार साहेबांच्याबरोबर राहिले आहेत. त्यांची पक्षनिष्ठा पाहून शरद पवार यांचा नेहमीच त्यांच्यावर वरदहस्त राहिला आहे. त्यांना मंत्रिमंडळातील अर्थमंत्री, गृहमंत्री यासारखी महत्त्वाची पदे दिली आहेत.