सांगली : जमीन वाटपाच्या वादातून नातू, सुनेने सासूला संपविले | पुढारी

सांगली : जमीन वाटपाच्या वादातून नातू, सुनेने सासूला संपविले

विटा; पुढारी वृत्तसेवा : जमिनीच्या वादातून सून आणि नातवाने सासूचा गळा आवळून खून केला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पारे गावात घडली. सखुबाई संभाजी निकम (वय 80) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या मूळच्या खानापूर तालुक्यातील चिंचणी (मं) येथील होत्या. रेणुका सतीश निकम (वय 45), त्यांचा मुलगा आशिष सतीश निकम (23 , रा. चिंचणी मं., ता. खानापूर, जि. सांगली) यातील प्रमुख संशयित आहेत. त्यांच्यासह एका अल्पवयीनास विटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मृताची मुलगी संगीता रामचंद्र साळुंखे (रा. पारे, ता. खानापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

सखुबाई आणि त्यांच्या नातवंडांच्यात जमिनीच्या वाटणीवरून वाद सुरू आहे. त्यामुळे सखुबाई या पारे गावातील मुलीकडे शिवामृत बिल्डींगमध्ये राहण्यासाठी आल्या होत्या. संशयित रेणुका आणि त्यांच्या मुलांना असे वाटत होते की, सतीश (सखुबाई यांचा मुलगा) याने निम्मी मिळकत आपल्या जावयाच्या कुणालच्या नावावर करावयाची होती. तसे सखुबाई यांना समजावण्यास त्यांनी बहीण संगीता यांना सांगितले होते. त्यामुळे संशयितांनी मंगळवारी पारे येथे साळुंखे यांच्या घरी येऊन धमकी दिली होती, असे फिर्यादीत म्हटले आहेे. त्यानंतर मंगळवारी, 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास संशयितांनी पारे येथे साळुंखे यांचे घर गाठले. तेथे सखुबाई यांचा गळा टॉवेलने आवळून त्यांना ठार केले आहे, असा आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी पारे आणि परिसरातील ग्रामस्थांची गर्दी झाली होती. या घटनेचा पारे येथील साळुंखे कुटुंबाला मोठा धक्का बसला. घटनास्थळी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविला.

Back to top button