कोयनेतून सोडले पाणी; दोन दिवसांत पाणी सांगलीत येणार | पुढारी

कोयनेतून सोडले पाणी; दोन दिवसांत पाणी सांगलीत येणार

सांगली; पुढारी वृत्तसेवा : उन्हाच्या तडाख्यामुळे कृष्णा नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा वाढलेला आहे. पात्रात चार दिवस पुरेल इतकाच साठा आहे. नदीपात्र कोरडे पडण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे कोयना धरणातून आणखी वाढीव अतिरिक्त पाणी सोडावे, अशी मागणी होती. त्याची तातडीने दखल घेत मंगळवारी (दि. 20) दुपारी वाढीव 500 क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे धरणातून 2 हजार 600 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, रात्री उशिरा आणखी 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
यंदाच्या हंगामात पाऊस कमी प्रमाणात झाला आहे. त्याशिवाय कोयना धरणातही अपुरा पाणीसाठा आहे. पंधरा दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढलेली आहे. त्यातच नदीतून उपसा वाढलेला आहे. कोयना धरणातून 2100 क्युसेक पाणी कृष्णा नदीत सोडण्यात येत होते. त्यातील 600 क्युसेक सातारा जिल्ह्यास, एक हजार क्युसेक टेंभू योजनेसाठी, तर ताकारी योजनेसाठी 500 क्युसेक पाणी देण्यात येते. त्याशिवाय नदीतून होणारा उपसा यामुळे नदीतून खाली सांगलीकडे येणारे पाणी कमी पडत आहे. साठपेवाडी बंधार्‍यापासून सांगलीपर्यंत पाणी कमी होऊ लागले आहे. पाणी कमी झाल्यास सांगलीसह नदीकाठावरील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याचा धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक झाली. त्यात धरणातून विसर्ग वाढवावा, अशी मागणी करण्यात आली. त्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांचा सातारा पाटबंधारे विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार मंगळवारी दुपारी 12 वाजता 500 क्युसेकने विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे आता 2 हजार 600 क्युसेक विसर्ग सुरू आहे. रात्री उशिरा आणखी 500 क्युसेक विसर्ग वाढविणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

दरम्यान, विसर्ग वाढविल्याने पाणी येथे दोन दिवसात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. पाणी सोडल्याने शेतकर्‍यांना व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पाणी जपून वापरा

यंदा कोयना धरणात अपुरा पाणीसाठा आहे. पाऊस कमी पडल्याने पाणीटंचाई आहे. जूनपर्यंत धरणातील पाणी जपून वापरावे लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. लोकांनीही पाणी जपून वापरावे, असे आवाहन अधिकार्‍यांनी केले आहे.

धरणातील पाणीसाठा

धरणात सध्या उपलब्ध पाणीसाठा 67.49 टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा 62.37 टीएमसी इतका आहे. धरणात सध्या उपलब्ध 64.12 टक्के तर उपयुक्त 62.29 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

Back to top button