सांगली येथे पाळत ठेवून व्यापार्‍याचा बंगला फोडला | पुढारी

सांगली येथे पाळत ठेवून व्यापार्‍याचा बंगला फोडला

सांगली; पुढारी वृत्तसेवा : शहरातील सह्याद्रीनगर परिसरातील व्यापार्‍याचा बंद बंगला फोडून दोघा चोरट्यांनी तब्बल वीस तोळे आणि वीस लाख रुपयांची रोकड असा 28 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. भरवस्तीत मध्यरात्री पडलेल्या या धाडसी घरफोडीमुळे एकच खळबळ उडाली. याबाबत विनोद श्रीचंद खत्री यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली आणि घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, खत्री यांचे शहरातील मारुती चौकात चप्पल विक्रीचे दुकान आहे. एकत्रित कुटुंब असल्याने ते कोल्हापूर रस्त्यावरील सह्याद्रीनगर परिसरात राहण्यास आहेत. दोन दिवसांपूर्वी घरात लग्नकार्य असल्याने खत्री कुटुंबीय कोल्हापूरला गेले होते. चोरट्यांनी पाळत ठेवून रविवार आणि सोमवार मध्यरात्री बंगल्याच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी घरातील बेडरूममधील ऐवज चोरून पोबारा केला.

खत्री कुटुंबीय बुधवारी घरी परतले. त्यांना चोरीची घटना निदर्शनास आली. त्यांनी शहर पोलिसांना तातडीने माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी तपासाच्या सूचना दिल्या. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, शहरचे निरीक्षक संजय मोरे यांचे पथकही घटनास्थळी दाखल होते. ठसे तज्ज्ञांसह श्वान पथकास पाचारण केले होते. परंतु, चोरट्यांनी वाहनातून पलायन केल्याची शक्यता असल्याने श्वानाने काही अंतरापर्यंत माग काढला. सराईत चोरट्याने ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

चोरट्यांच्या मार्गावर दोन पथके

दोघा चोरट्यांनी ही चोरी केल्याचे प्राथमिक तपासात माहिती समोर आली आहे. त्यामुळे चोरट्यांच्या मार्गावर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि सांगली शहर गुन्हे प्रकटीकरण अशी दोन वेगवेगळी पथके रवाना झाली आहेत.

रेकी करून घरफोडी

बंगल्यात कोठेकोठे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. याची माहिती चोरट्यांना होती. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रीत होऊ नये यासाठी रेकी करून सीसीटीव्ही कॅमेर्‍याची वायर कापली. तसेच खत्री कुटुंबिय लग्नकार्यासाठी गावी जाणार असल्याची माहिती असल्याले चोरट्यांनीच ही घरफोडी केली असल्याचा देखील पोलिसांना संशय आहे. त्यासाठी त्यांनी अनेक दिवसांपासून खत्री यांच्या बंगल्याजवळ रेकी केली असल्याचा देखील संशय आहे.

प्रत्येक खोलीत शोधाशोध

चोरट्यांनी खत्री यांच्या बंगल्यातील प्रत्येक खोलीत शोधाशोध केली आहे. त्यामुळेच त्यांच्या हाती इतके मोठे घबाड लागले. यावेळी चोरट्यांनी प्रत्येक खोलीतील साहित्य विस्कटून टाकले होते.

सीसीटीव्हीची वायर कापून बंगल्यात प्रवेश

चोरट्यांनी बंगल्याच्या परिसरात असणारी सीसीटीव्ही कॅमेर्‍याची वायर कापली होती. खत्री यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ तीन सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे चोरट्यांनी रेकी करूनच पाठीमागील दरवाजातून आतमध्ये प्रवेश केला.

Back to top button