डिसेंबर 24 पर्यंत भारतीय अंतराळवीर अवकाशात जातील : डॉ. वेंकटेश्वर शर्मा | पुढारी

डिसेंबर 24 पर्यंत भारतीय अंतराळवीर अवकाशात जातील : डॉ. वेंकटेश्वर शर्मा

आष्टा; पुढारी वृत्तसेवा : इस्त्रोकडून सध्या रोबोट अंतराळामध्ये पाठविण्याचे प्रयोग सुरू आहेत. हा प्रयोग डिसेंबर 2024 अखेर पूर्णत्वास जाईल. त्यानंतर भारतीय अंतराळवीरांना अवकाशामध्ये पाठविण्याबद्दल कार्यवाही सुरु केली जाईल, अशी माहिती इस्त्रोचे उपसंचालक डॉ. वेंकटेश्वर शर्मा यांनी दिली.

येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी इस्त्रोच्या सहकार्याने आपला स्वत:चा उपग्रह जून 2026 पर्यंत अंतराळात प्रक्षेपित करतील, असेही ते म्हणाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब डांगे, कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई व संचालक डॉ. विक्रम पाटील उपस्थित होते.

डॉ. शर्मा यांनी चंद्रयान 1, चंद्रयान 2, चंद्रयान 3, मंगळयान, आदित्य एल 1 या सर्व मोहिमांची विस्तृत माहिती दिली. तसेच इस्त्रोच्या गगनयान, सूर्ययान या भविष्यातील प्रकल्पांबद्दल चर्चा केली. ते म्हणाले, डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करणे व त्यांच्यात संशोधन वृत्ती वृद्धिंगत करण्यासाठी इस्त्रोच्या सहकार्याने जून 2024 पासून नॅनो उपग्रह तयार करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी प्राध्यापकांचा एक गट तयार केला जाईल. तीन वर्षे हे काम सुरू राहील. असा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविणारे हे महाराष्ट्रातील पहिलेच खासगी महाविद्यालय असेल. या उपग्रहाचा वापर देशातील व परदेशातील इतर संस्थांना त्यांचे संशोधन सुरू ठेवण्यासाठीही करता येईल. यावेळी अण्णासाहेब डांगे म्हणाले, संस्थेच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या बाबींमध्ये महाराष्ट्रात अग्रभागी स्थान मिळवले आहे. आमच्या आयुर्वेदिक महाविद्यालयाने पुणे विभागातून गुणवत्तेबाबत प्रथम क्रमांक मिळविलेला आहे.

कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई म्हणाले, या उपग्रहासाठी अंदाजे दीड ते दोन कोटी एवढा प्रचंड खर्च अपेक्षित आहे. परंतु मुलांच्या कौशल्य विकासासाठी व त्यांच्या संशोधन वृत्तीस चालना देण्यासाठी संस्था सर्व प्रकारचे सहकार्य करेल.
यावेळी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. शैलेंद्र हिवरेकर, डीन क्वालिटी अ‍ॅश्युरन्स डॉ. अभिजित जाधव, एरोनॉटिकल विभागप्रमुख प्रा. किरणबाबू, प्रशासकीय अधिकारी दीपक अडसूळ उपस्थित होते.

Back to top button